येवला हादरले... बिलाच्या वादातून नामांकित डॉक्टरावर जीवघेणा हल्ला... पत्नीलाही धक्काबुक्की...

Share:
Main Image
Last updated: 26-Oct-2026

 

विलास कांबळे, (येवला) २६ ऑक्टोबर - येवला शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या बिलावरून झालेल्या वादातून एका नामांकित डॉक्टरावर लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. एवढेच नव्हे तर, पतीचा बचाव करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बिलाच्या वादातून रस्त्यात गाठून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, येवल्यातील ताजपार्क परिसरातील प्रसिद्ध 'मातोश्री हॉस्पिटल'चे संचालक डॉ. सुशांत विजय पाटील यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. एका रुग्णाच्या बाळंतपण आणि उपचाराच्या बिलावरून डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये वाद निर्माण झाला होता. डॉ. पाटील हे आपल्या खासगी कामासाठी बाहेर जात असताना, हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठले आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाण सुरू असताना पतीला वाचवण्यासाठी डॉ. पाटील यांची पत्नी धावून गेली असता, हल्लेखोरांनी त्यांनाही सोडले नाही आणि धक्काबुक्की केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल; पोलिसांकडून गंभीर कलमे लागू

घटनेनंतर पीडित डॉक्टर दांपत्याने तातडीने येवला शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हल्लेखोरांवर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम ७४, ११८/१, १८९/२, १९०, १९१/२, १२६/२, ३२४/२, ११५, ३५२ आणि ३५१/३ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनीही डॉक्टर दांपत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने या प्रकरणी दोन्ही बाजूंवर परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

DYSP रोशन पंडित पोलीस ठाण्यात दाखल; तपास तीव्र

शहरातील वाढता तणाव आणि घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) रोशन पंडित यांनी तात्काळ येवला शहर पोलीस ठा गाठले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरू आहे.

डॉक्टर दांपत्याची आक्रमक मागणी

या घटनेनंतर पीडित डॉक्टर दांपत्याने अत्यंत आक्रमक आणि संतप्त भूमिका घेतली आहे. "भरदिवसा रस्त्यावर डॉक्टरांवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ले होत असतील, तर आम्ही सुरक्षित कसे राहणार? हल्ला करणाऱ्या सर्व गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून गजाआड करावे आणि आम्हाला कठोर न्याय द्यावा," अशी मागणी त्यांनी केली आहे.

रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांवरच असा जीवघेणा हल्ला झाल्याने येवल्यातील डॉक्टर संघटनांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणातील आरोपींवर कधी आणि काय कठोर कारवाई करते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

Comments

No comments yet.