दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २५ ऑक्टोबर - शबरी नॅचरल्सचे पॅकेजिंग हे केवळ उत्पादनांचे वेष्टन नसून, त्यातून समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. या वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंगला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘गुड डिझाईन अवॉर्ड’मुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीला थेट जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकप्रिय ‘मन की बात’ या कार्यक्रमातून ‘शबरी नॅचरल्स’च्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘मन की बात’च्या १३९ व्या भागात या ब्रँडचा विशेष उल्लेख केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘शबरी नॅचरल्स’चा उद्देश आणि यश
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत ‘शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत’ विकसित करण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रँडने आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कला, कौशल्य आणि नैसर्गिक उत्पादनांना एक नवी आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना हा उपक्रम खऱ्या अर्थाने बळ देत असून, याद्वारे आदिवासी उद्योजकतेला नवी दिशा मिळत आहे.
आदिवासी कला परंपरांचे आकर्षक पॅकेजिंग
शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचे पॅकेजिंग हे या संपूर्ण उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारली, गोंड आणि चित्रकथी यांसारख्या लोककला तसेच समृद्ध आदिवासी संस्कृतीचे सुंदर प्रतिबिंब या पॅकेजिंगमधून उमटते. या अद्वितीय कल्पकतेला राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया डिझाईन मार्क’ तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जपानचा अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. या सन्मानांमुळे शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांनी जागतिक बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
डिजिटल माध्यम आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगमुळे मोठी बाजारपेठ
आदिवासी बांधवांनी तयार केलेली अस्सल आणि नैसर्गिक उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी शबरी नॅचरल्सने डिजिटल युगाचा यशस्वी अवलंब केला आहे. आधुनिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही उत्पादने आता ग्राहकांना घरपोच सहज उपलब्ध होत आहेत.
याशिवाय, कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या माध्यमातूनही या उत्पादनांना उत्तम बाजारपेठ मिळत आहे. बांबू हस्तकला, विविध नैसर्गिक व कृषी उत्पादने तसेच मोहापासून तयार केलेल्या वस्तूंच्या आकर्षक भेटसंचांना (Gift Hampers) विविध व्यावसायिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्रातून प्रचंड मागणी वाढली आहे. या माध्यमातून दुर्गम भागांतील आदिवासी कारागीर, शेतकरी आणि महिला बचत गटांना हक्काचे व शाश्वत रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
मंत्र्यांनी आणि आयुक्तांनी व्यक्त केला आनंद
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये शबरी नॅचरल्सचा गौरवपूर्ण उल्लेख केल्यामुळे आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. हा ब्रँड केवळ उत्पादनांचा नसून महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा जगासमोर मांडणारा आरसा आहे.”
— डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री
“आदिवासी संस्कृती आणि कलाकृती हे आपल्या सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहेत. शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून या दर्जेदार उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे. प्रधानमंत्री महोदयांनी या उपक्रमाची दखल घेणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
— लीना बनसोड, आदिवासी विकास आयुक्त