शंखनादाच्या विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ... अमेरिकेचा हा विक्रम मोडला... बघा, सामूहिक शंखनादाचा हा व्हिडिओ...

Share:
Main Image
Last updated: 25-Oct-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) २५ ऑक्टोबर - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची भव्य आध्यात्मिक नांदी गाठत, गोदावरीच्या पवित्र तीरावर ५१७ जणांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद करून जागतिक कीर्ती प्रस्थापित केली आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे नाशिकच्या नावे नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली असून, अमेरिकेच्या नावे असलेला ३०३ शंखवादकांचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी “तुम्ही नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे!” अशी अधिकृत घोषणा करताच यशवंत महाराज पटांगण ‘भारत माता की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.

कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर अभूतपूर्व सोहळा

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या औचित्यावर गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणात या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. ५०० हून अधिक शंखवादकांनी फुंकलेल्या शंखांच्या पवित्र निनादाने संपूर्ण गोदाकाठ भक्तिमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाला. या सोहळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची भव्यता जगासमोर आली.

मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप यांच्यासह विविध क्षेत्रांतील सनदी अधिकारी, साधू-महंत, वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमेरिकेचा विक्रम मोडून ५१७ वादकांचे यश

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या निकषांनुसार, शंखनाद करण्यासाठी प्राणायाम, श्वसनावर नियंत्रण आणि दीर्घ सरावाची गरज असते. या उपक्रमासाठी ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. दोन विशेष निरीक्षकांनी प्रत्यक्ष कामगिरीची आणि सहभागाची कडक पडताळणी केली. सर्व निकष यशस्वीरीत्या पूर्ण करत ५१७ जणांनी एकाच वेळी दिलेला शंखध्वनी अचूक ठरला. यामुळे अमेरिकेतील ३०३ शंखवादकांचा जुना विक्रम मागे पडला आणि नाशिकने जागतिक पटलावर आपला सांस्कृतिक ठसा उमटवला.

"हा केवळ नाशिकचा नाही, तर संपूर्ण भारताचा गौरव!" – गिरीश महाजन

“शंखनाद मध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे व वादकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, संपूर्ण भारताच्या लौकिकात भर घालणारा आहे. यातून आपली समृद्ध आध्यात्मिक परंपरा आणि भारतीय संस्कृतीची सामूहिक शक्ती जगासमोर आली आहे.”

— गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक जिल्हा

सिंहस्थ कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककराचा सोहळा

पालकमंत्री महाजन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ सरकार किंवा प्रशासनाचा कार्यक्रम नसून, प्रत्येक नाशिककराचा स्वाभिमानाचा सोहळा आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले जाते, त्याच भावनेने देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा सन्मान आणि आदरातिथ्य करणे हे आपले कर्तव्य आहे. रस्ते, घाट, स्वच्छता, निवास व भोजन व्यवस्था याबाबत प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही समन्वयाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

३१ ऑक्टोबरला होणार ध्वजारोहण; पूर्वतयारीला वेग

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून येत्या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील ऐतिहासिक रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अधिकृत ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. याच वेळी त्र्यंबकेश्वर येथेही ध्वजारोहण केले जाणार असून, या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले. या जागतिक विक्रमाने कुंभमेळ्याच्या तयारीला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.

याप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,  प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, प्रमोद पवार, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, अमोल चौधरी, कार्यकारी अभियंता विद्युत निलेश बिऱ्हाडे, आत्मा चे  प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद,तहसीलदार मकरंद दिवाकर आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

 

Comments

No comments yet.