येवल्यात लग्न मंडपामध्ये थरारक घटना... डिझेल ओतून नवरदेवाला पेटवण्याचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 25-Oct-2026

 

विलास कांबळे, (येवला) २५ ऑक्टोबर - शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाचा राग मनात धरून मुलीकडच्या नातेवाइकांनी थेट सुरू असलेल्या लग्न मंडपात धडक मारली आणि वऱ्हाडी मंडळी, महिला तसेच लहान मुलांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या अमानुष प्रकारामुळे विवाह सोहळ्यात एकच भगदड उडाली असून, दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. सुदैवाने पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या प्रकरणी १० ते १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, येवला शहरातील ऋषभ दीपक भगुंडे या तरुणाचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी (सप्टेंबर महिन्यात) घरच्यांच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केले होते. या तरुण-तरुणीच्या विवाहाची दोन महिने पूर्ण झाल्यामुळे, मुलाच्या कुटुंबीयांनी आप्तस्वकीयांना एकत्र करून येवल्यातील एका लॉन्समध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

विधी अगदी उत्साहात सुरू असतानाच, मुलगी पळवून नेल्याचा आणि प्रेमात धोका मिळाल्याचा राग मनात बाळगून असलेल्या मुलीकडील नातेवाइकांनी अचानक लग्न मंडपात धाव घेतली. विशेष म्हणजे, ते आधीच डिझेलचे कॅन सोबत घेऊन आले होते. मंडपात प्रवेश करताच त्यांनी नवरदेव ऋषभ भगुंडे, त्याचे कुटुंबीय, पाहुणे, महिला आणि लहान मुलांच्या अंगावर थेट डिझेल फेकण्यास सुरुवात केली आणि त्यांना जिवंत पेटवून देण्याचा क्रूर प्रयत्न केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लग्नसमारंभातील आनंदाचे वातावरणात काही क्षणातच भीती आणि दहशतीत बदलले.

दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि जखमी

मुलीकडच्या मंडळींचे हे कृत्य रोखण्यासाठी नवरदेवाच्या नातेवाइकांनी आणि वऱ्हाड्यांनी प्रयत्न केला. यावरून दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची आणि तुंबळ हाणामारी झाली. या राड्यात आणि दगडफेकीत सुमारे ७ ते ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका बाजूला हेही सांगितले जात आहे की, या तरुणाचे सदर तरुणीशी प्रेमसंबंध असले तरी त्याचे इतरत्र लग्न ठरले होते; ही बाब समजताच संतप्त झालेली पहिली युवती आणि तिचे घरचे मंडळी थेट लग्न मंडपात धडकले आणि त्यांनी हा राडा घातला.

पोलिसांची तत्परता आणि कारवाई

या गंभीर घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत वेगाने सूत्रे हलवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि संतप्त जमावाला पांगवले. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १० ते १२ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या भयानक प्रकारामुळे येवला शहरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, येवला पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा जीवघेणा अनर्थ टळला असून, सध्या शहरात पूर्ण शांतता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे नेमके कोणकोण सहभागी होते, याचा शोध घेतला जात आहे. कायद्याची पर्वा न करता भरमंडपात घडवून आणलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

Comments

No comments yet.