नाशकात आज होणार हा विश्वविक्रम... रामकुंड परिसरात ऐतिहासिक...

Share:
Main Image
Last updated: 25-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २४ ऑक्टोबर - आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या मंगलारंभाचा व ध्वजारोहणाचा सुवर्णक्षण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पवित्र गोदातीरावर उद्या, रविवार (२५ ऑक्टोबर २०२६) रोजी कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर एकाच वेळी ५०१ शंखांचा निनाद घुमणार आहे. देवमामलेदार पटांगणाजवळ होणाऱ्या या भव्य सामूहिक शंखनाद सोहळ्यातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा महापर्रायोजन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जागतिक पातळीवर दर्शन घडणार असून संपूर्ण शहरात उत्साहाचे व भक्तीचे वातावरण पसरले आहे.

३०३ शंखवादकांच्या विक्रमाला मागे टाकण्याचा मान

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण व गुणगौरव न्यास संचालित अनंतविजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त पुढाकारातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सनातन धार्मिक परंपरेनुसार कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ शंखनादाने केला जातो. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महासोहळ्याच्या पूर्वसंध्येला प्राचीन परंपरेचा जागर करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

यापूर्वी एकाच वेळी ३०३ जणांनी शंखनाद केल्याची अधिकृत नोंद आहे. हा विक्रम मोडीत काढत ५०१ जणांचा सहभाग असलेला नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवली आहे. विशेष म्हणजे, आगामी ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणीही याच समूहातील २५१ शंखवादक शंखनाद करून मंगलारंभ करणार आहेत.

कार्यक्रमाचे वेळापत्रक व प्रशासकीय नियोजन

उद्या सायंकाळी चार वाजल्यापासून सहभागी होणाऱ्या सर्व शंखवादकांची नोंदणी, प्रत्यक्ष उपस्थिती तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत पथकाकडून सर्व निकषांची तपासणी झाल्यानंतर विश्वविक्रमाचा हा ऐतिहासिक प्रयत्न प्रत्यक्षात आणला जाईल.

वेळ: सायंकाळी ५:५० वाजता (मुख्य शंखनाद)

स्थळ: देवमामलेदार पटांगणाजवळ, नाशिक

गोदाआरती: सायंकाळी ७:०० वाजता

शंखनाद सोहळ्यानंतर लगेचच सायंकाळी सात वाजता गोदाकाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सामूहिक शंखनादाचा नादब्रह्म आणि गोदाआरतीचा प्रकाश असा अद्वैत संगम गोदातीरावर अनुभवायला मिळणार आहे.

रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहणासाठी काटेकोर नियोजन

सिंहस्थ महाकुंभमेळ्यांतर्गत रामकुंड (नाशिक) आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारे ध्वजारोहण सोहळे अत्यंत सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. प्राधिकरणाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत पास व्यवस्थापन, आसनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग आणि गर्दी नियंत्रणाबाबत काटेकोर निर्देश देण्यात आले.

या बैठकीस महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पारदर्शक पास व आसनव्यवस्था

ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणारे मान्यवर, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी श्रेणीनुसार पास वितरणाचे अचूक नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मुख्य मंचासमोरील परिसर मोकळा ठेवणे, माध्यम प्रतिनिधींसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र दीर्घा तयार करणे तसेच निमंत्रितांच्या आसनव्यवस्थेचा अचूक आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

वाहतूक आणि पार्किंगसाठी स्वतंत्र आराखडा

ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. शासकीय कार्यालयांच्या समन्वयातून सामूहिक बससेवेचा पर्याय वापरण्यावर भर दिला जात आहे. वाहनतळ, प्रवाशांना उतरण्याचे ठिकाण आणि कार्यक्रमस्थळापर्यंतचे मार्ग दर्शवणारे नकाशे व दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी मार्गदर्शक ॲनिमेटेड व्हिडिओ तयार करण्याचेही ठरले आहे.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व संबंधित विभागांना आपापल्या जबाबदाऱ्या समन्वय ठेवून वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या दोन्ही ऐतिहासिक सोहळ्यांमुळे नाशिक नगरीत धार्मिक आणि सांस्कृतिक आनंदाची नवी लहर आली असून भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

Comments

No comments yet.