नाशिक जिल्हा परिषदेत संपन्न झाला हा अनोखा विवाह सोहळा... संसारोपयोगी साहित्य आणि १ लाखांची मदतही...

Share:
Main Image
Last updated: 24-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २४ ऑक्टोबर - सामाजिक रूढी-परंपरांच्या चौकटी मोडून एकल महिलांना समाजात पुन्हा सन्मानाचे, स्वाभिमानाचे आणि आशेचे जीवन मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या ‘नवचेतना अभियाना’अंतर्गत पाच एकल महिलांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा शनिवारी (२४ ऑक्टोबर) अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे पाच महिलांच्या आयुष्यात नव्या आशेचा आणि आनंदाचा पहाट उजाडला असून, पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना मोठा आधार मिळाला आहे.

मान्यवरांची उपस्थिती अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभेच्छा संदेश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विवाह सोहळ्यास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार किशोर दराडे, आमदार सरोज आहिरे, उपमहापौर विलास शिंदे आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी प्रास्ताविक करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यासाठी पाठविलेल्या विशेष शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या या मानवी संवेदना जपणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

एकल महिलांबाबतचा सामाजिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे : मंत्री नरहरी झिरवाळ

सोहळ्यात बोलताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी समाजातील वास्तवावर बोट ठेवले. ते म्हणाले, "दुर्दैवाने आजही आपल्या समाजात एकल, विधवा किंवा परित्यक्ता महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो. त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. ही नकारात्मक मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. नाशिक जिल्हा परिषदेने नवचेतना अभियानाच्या माध्यमातून घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून, यामुळे समाजात सकारात्मक बदलाची नवी लाट निर्माण होईल."

सामाजिक पुनरुत्थानाचा नवा अध्याय : मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या उपक्रमाचे मोकळ्या मनाने कौतुक केले. "हा केवळ विवाह सोहळा नसून सामाजिक समानतेची आणि सन्मानाची भावना रुजवणारा एक महायज्ञ आहे. एकल महिलांना पुन्हा एकदा वैवाहिक जीवन सन्मानाने जगण्याची संधी देऊन जिल्हा परिषदेने महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला साजेसे कार्य केले आहे," असे सांगत मंत्री भुसे यांनी सर्व नवदाम्पत्यांना सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही या उपक्रमाचे अभिनंदन करताना, "सीईओ ओमकार पवार आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या समन्वयामुळे समाजाला एक नवी दिशा देणारे कार्य उभे राहिले आहे," असे मत व्यक्त केले.

पुनर्विवाह चळवळीला नव्याने गती : हेरंब कुलकर्णी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी भारतातील पुनर्विवाह चळवळीचा इतिहास अधोरेखित केला. स्वातंत्र्योत्तर काळात काही प्रमाणात मंदावलेल्या या चळवळीला नाशिक जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पुन्हा एकदा मोठी प्रशासकीय व सामाजिक गती मिळाली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

नवदाम्पत्यांना १ लाख ३१ हजारांचे भरीव आर्थिक सहाय्य

या सोहळ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवविवाहित जोडप्यांना दिलेला ठोस आर्थिक आणि सामाजिक आधार!

मुलांच्या भविष्यासाठी बचतपत्रे: पुनर्विवाह करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांच्या अपत्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी १ लाख रुपयांच्या बचतपत्रांचे (Fixed Deposit) वाटप करण्यात आले.

संसाराची सुरुवात करण्यासाठी रोख मदत: नवीन संसाराला लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक नवदाम्पत्याला ३१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

विवाहबद्ध झालेली नवदाम्पत्ये:

१. कल्याणी संजय पगार – योगेश बापू आहेर (रा. बगडू, ता. कळवण)

२. विजया हिम्मत देवरे – शशिकांत दादाजी देवरे (ता. बागलाण)

३. सुरेखा धैर्यशील बोरस्ते – सुदाम रामनाथ लोहकर (रा. तळेगाव, ता. दिंडोरी)

४. अनुप्रिता हेमंत बोराळे – मयूर दिलीप जोशी (रा. नानेगाव, नाशिक)

५. ज्योती एकनाथ बागुल – राम वामन कांबळे (रा. पाथर्डी, नाशिक)

सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ

‘नवचेतना अभियान’ हे केवळ शासकीय कागदपत्रांपुरते किंवा योजनांचा लाभ देण्यापुरते मर्यादित न राहता, एकल महिलांना आर्थिक स्थैर्य, आत्मसन्मान आणि कौटुंबिक सुरक्षितता मिळवून देणारे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाने संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श संपूर्ण राज्यासमोर घालून दिला आहे.

 

 

Comments

No comments yet.