कुंभमेळ्यात CSR निधीतून होणार ही विकासकामे... या प्रमुख क्षेत्रांवर असणार भर...

Share:
Main Image
Last updated: 24-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २४ ऑक्टोबर -  आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' केवळ एका धार्मिक सोहळ्यापुरता मर्यादित न राहता त्याद्वारे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराचा दीर्घकालीन व शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनात उद्योग क्षेत्राचा (Corporate Sector) सक्रिय सहभाग आणि तांत्रिक कौशल्य मिळवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने ‘सिंहस्थ पार्टनर्स – सीएसआर सीईओ मीट’चे (CSR CEO Meet) आयोजन करण्यात आले होते. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या बैठकीत कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात आरोग्य, स्वच्छता, तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या विविध प्रकल्पांवर विस्तृत चर्चा झाली.

प्रशासकीय अनुभव अन् कॉर्पोरेट कौशल्याचा संगम

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रमोद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळा ही केवळ प्रशासनाची एकट्याची जबाबदारी नसून, सामूहिक प्रयत्नातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचे ते एक व्यासपीठ आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी केवळ आर्थिक मदत न देता त्यांचे तांत्रिक कौशल्य, व्यावसायिक अनुभव आणि नावीन्यपूर्ण (Innovative) उपाय प्रशासनासोबत शेअर करावेत."

कुंभमेळ्याच्या काळात करोडो भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचा लाभ स्थानिक नागरिकांना कुंभमेळ्यानंतरही दीर्घकाळ मिळत राहावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रमुख क्षेत्रांवर असणार 'सीएसआर'चा भर

बैठकीदरम्यान विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी खालील प्रमुख विषयांवर सहकार्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली:

 * आरोग्य व आपत्कालीन सेवा: अहोरात्र आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता.

 * स्वच्छता व कचरा व्यवस्थापन: अत्याधुनिक आणि यांत्रिक पद्धतीचा वापर करून स्वच्छता व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.

 * पर्यावरण संवर्धन व हरित उपक्रम: पर्यावरणपूरक व्यवस्था, वृक्षारोपण आणि 'सिंगल युज प्लास्टिक' बंदीची प्रभावी अंमलबजावणी.

 * डिजिटल तंत्रज्ञान: भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल व स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर.

 * सामाजिक विकास: महिला सक्षमीकरण आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देणे.

पारदर्शकता आणि थेट परिणामांवर भर

अतिरिक्त आयुक्त प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले की, उद्योग क्षेत्र आणि प्रशासनामध्ये प्रभावी समन्वय साधून प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल. या भागीदारीत पारदर्शकता, उत्तरदायित्व (Accountability) आणि थेट सकारात्मक परिणाम साधण्यावर प्राधिकरणाचा मुख्य भर असणार आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानाधारित आणि पर्यावरणपूरक सेवांचा फायदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शहरवासीयांना पुढील अनेक वर्षे मिळत राहील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

 

Comments

No comments yet.