शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर... एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या...

Share:
Main Image
Last updated: 23-Oct-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) २३ ऑक्टोबर -  राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ची राज्यात अत्यंत प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असणाऱ्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

१५.८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १३,२७५ कोटी जमा

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी योजनेच्या प्रगतीबाबत माहिती देताना सांगितले की, महाआयटी (MahaIT) मार्फत विकसित करण्यात आलेल्या विशेष पोर्टलवर राज्यातील विविध बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.

संगणकीय प्रक्रियेनंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे, अशा १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या याद्यांचा तपशील:

शासनाने टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

 * पहिली यादी: १६,९६,२०१ पात्र शेतकरी

 * दुसरी यादी: ४,१९,७३७ पात्र शेतकरी

 * तिसरी यादी: ३,५१,१९२ पात्र शेतकरी

 * एकूण (पहिले ३ टप्पे): २४,६७,१३० पात्र शेतकरी

 * चौथी यादी (आज प्रसिद्ध): १,१५,६९७ पात्र शेतकरी (एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेले)

ही चौथी यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (विकास संस्था) आणि ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

'हेअरकट' धोरण आणि १ एप्रिलनंतरचे व्याज माफ

या चौथ्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जथकबाकीची गणना ३१ मार्च २०२६ या दिनांकापर्यंतची धरण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतर लागलेले व्याज आणि इतर सर्व प्रशासकीय खर्च पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, या यादीतील राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार ही सर्व कर्जे पूर्णपणे निरंक (माफ) करण्यात येणार आहेत.

मृत व वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी 'एसओपी' (SOP)

योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासनाने विशेष पावले उचलली आहेत. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे किंवा जे वयोवृद्ध आहेत आणि ज्यांच्या बोटांच्या ठशांची (Biometrics) नोंद होत नाही, अशा लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित केली आहे.

शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

चौथ्या यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून घ्यावी आणि नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्रावर' (CSC) जाऊन तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.

 

Comments

No comments yet.