नाशिक, (प्रतिनिधी) २३ ऑक्टोबर - आयोडीन हे मानवी शरीराच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारे सूक्ष्म पोषक घटक आहे. शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास गलगंड, थायरॉईडशी संबंधित विविध आजार तसेच लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर विपरीत व गंभीर परिणाम होऊ शकतो. हे विकार टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी दैनंदिन आहारात आयोडीनयुक्त मिठाचा नियमित वापर करावा आणि त्याची योग्य साठवणूक करावी, असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. दावल साळवे यांनी केले.
‘राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या वतीने एका विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. साळवे बोलत होते.
या रॅलीच्या वेळी गलगंड नियंत्रण कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली देवरे आणि डॉ. पंकज ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
गर्भवती माता व बालकांसाठी आयोडीन अत्यंत गरजेचे
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. साळवे पुढे म्हणाले की, "विशेषतः गर्भवती माता, नवजात बालके आणि वाढत्या वयातील मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी आयोडीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे गंभीर आजार व मानसिक व्यंग टाळण्यासाठी यासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अचूक माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे."
समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक
आयोडीन न्यूनता विकारांचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी केवळ आरोग्य विभागाचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, तर यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. नर्सिंगचे विद्यार्थी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिक्षण आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आयोडीनयुक्त मिठाच्या वापराबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहनही डॉ. साळवे यांनी या वेळी केले.
'आयोडीनयुक्त मीठ वापरा, निरोगी जीवनाचा पाया घाला'
या जनजागृती रॅलीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी विविध फलकांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. "आयोडीनयुक्त मीठ वापरा, निरोगी जीवनाचा पाया घाला" आणि "आयोडीनची कमतरता टाळा, भावी पिढीचे आरोग्य जपा" अशा विविध प्रभावी संदेशांद्वारे नाशिककरांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली. आयोडीनयुक्त मिठाचा वापर कसा करावा, त्याची साठवणूक करताना कोणती काळजी घ्यावी आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार कसे रोखावेत, याबाबत सविस्तर माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.