निवृत्त पोलिसाला महिलेचा फोन आला... २० दिवस ठेवले... तब्बल ७१ लाखांना गंडा...

Share:
Main Image
Last updated: 22-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑक्टोबर - राज्यात आणि विशेषतः नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले असून, फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. यामध्येच एका खळबळजनक घटनेत, खुद्द पोलिसात सेवा बजावलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच सायबर भामट्यांनी तब्बल २० दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) करून ७१ लाखांहून अधिक रुपयांची चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अशी झाली गुन्ह्याची सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अधिकारी नाशिकमधील असून ते पोलीस विभागातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावरून निवृत्त झालेले आहेत. गत २८ सप्टेंबर रोजी त्यांना एका महिला संशयिताचा फोन आला. आपण मुंबई येथील दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) मुख्यालयातून ‘इन्स्पेक्टर सीमा रॉय’ बोलत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर फोनवरील दुसऱ्या एका व्यक्तीने एनआयएचा (NIA) अधिकारी असल्याचे भासवून, पीडिताच्या आधार कार्डचा गैरवापर करून लखनौमध्ये एक बँक खाते उघडण्यात आल्याचे सांगितले. याच बनावट बँक खात्याच्या माध्यमातून तब्बल ७० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

२० दिवस ठेवले ‘डिजिटल अरेस्ट’

सुरुवातीला गुन्हे शाखेची आणि अटकेची भीती दाखवून सायबर चोरांनी निवृत्त अधिकाऱ्याला मानसिक दबावाखाली आणले. २८ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या तब्बल २० दिवसांच्या कालावधीत त्यांना सतत ‘डिजिटल अरेस्ट’च्या बंधनात ठेवण्यात आले. या काळात त्यांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सतत व्हिडिओ कॉल आणि ऑनलाईन माध्यमातून त्यांच्यावर पाळत ठेवून संशयितांनी त्यांच्या कुटुंबाची माहिती, वैयक्तिक संपत्ती आणि बँक बचतीचा संपूर्ण तपशील जाणून घेतला.

प्रकरणाची चौकशी आणि खात्याची क्लिन चिट देण्याच्या नावाखाली भामट्यांनी विविध बँक खात्यांवर आरटीजीएस व ऑनलाईन माध्यमातून एकूण ७१ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित निवृत्त अधिकाऱ्याने तातडीने नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, बँक खात्यांच्या माहितीवरून पैसे कुठे वर्ग झाले याचा सखोल तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या वाढत्या प्रकारावर तीव्र चिंता व्यक्त करत सायबर पोलिसांनी नागरिकांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा, पोलीस किंवा तपास संस्था कधीही व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलवर ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही किंवा चौकशीच्या नावाखाली पैसे मागवत नाही. अशा प्रकारच्या बनावट कॉल्स आल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.