आमदारांनाही कोट्यवधींचा चुना लावला... नाशिकच्या भोंदूबाबाचा कारनामा उघड...

Share:
Main Image
Last updated: 22-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑक्टोबर - गंगापूर परिसरात अंधश्रद्धा आणि जादुई शक्तींच्या जोरावर लोकांना गंडा घालणाऱ्या एका बोगस बाबाचे प्रकरण आता राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारे ठरले आहे. पनवेल येथील एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी समोर आलेला ‘बोगस बाबा’ अरुण धोंडू पाटील याचा हा गुन्हा आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत खानदेश आणि मराठवाड्यातील दोन आमदारांना याच भोंदू बाबाने तब्बल २ कोटी २५ लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पनवेलमधील एका महिलेने काही दिवसांपूर्वी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी अरुण पाटील याने तिला आजारपणातून पूर्ण बरे करण्याचे खोटे आमिष दाखवले होते. तसेच, जादुई व अंगातील गुप्त शक्तींच्या माध्यमातून ‘पैशाचा पाऊस पाडतो’ किंवा पैसा वाढवून देतो असे सांगून तिला नाशिकच्या गंगापूर परिसरात बोलावून घेतले होते. तिच्याकडून या कामी सुमारे ७.५ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, ना महिलेचा आजार बरा झाला, ना तिने दिलेले पैसे परत मिळाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गंगापूर पोलिसांनी आरोपी अरुण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा व्याम विस्तारत गेला आणि राजकारणात खळबळ उडवून देणारी नवी माहिती बाहेर आली.

दोन आमदारांना २.२५ कोटींचा चुना

पोलिसांच्या तपासात आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, खानदेश आणि मराठवाड्यातील दोन आमदार मागील जवळपास दोन वर्षांपासून या भोंदू बाबाच्या संपर्कात होते. याच कालावधीत अंगात दैवी शक्ती असल्याचा आणि समस्या दूर करण्याचा दावा करणाऱ्या या भामट्याने वेगवेगळ्या कारणांखाली या दोन्ही आमदारांकडून तब्बल २ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या आमदारांची नावे आणि आर्थिक व्यवहारांचे नेमके तपशील अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत, परंतु या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

आरोपी फरार, पोलिसांकडून कसून तपास सुरू

गुन्हा उघडकीस आल्यानंतर बोगस बाबा अरुण पाटील सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि यापूर्वी त्याने किती जणांना फसवले आहे, याचा छडा लावण्यासाठी सायबर व गुन्हे शाखा तपास करत आहे. राजकीय नेत्यांचा सहभाग समोर आल्यामुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून पोलीस या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि पुराव्यांची छाननी करत आहेत.

 

Comments

No comments yet.