नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २१ ऑक्टोबर - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या आगामी भव्य सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या ३१ ऑक्टोबर रोजीच्या ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवन येथे सादर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन हे निमंत्रण प्रदान केले. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या औपचारिक निमंत्रणासोबतच महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा, आदिवासी उद्योजकता, हस्तकला, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारा एक विशेष आणि कलात्मक भेटवस्तू संच राष्ट्रपतींना सप्रेम भेट देण्यात आला.
विविध उपक्रमांचे राष्ट्रपतींना आमंत्रण
ध्वजारोहण सोहळ्यासोबतच त्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी राष्ट्रपतींना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये —
* पवित्र गोदा आरती
* नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे (Website) उद्घाटन
* अधिकृत 'कुंभमेळा गीता'चे लोकार्पण
* विशेष 'कॉफीटेबल बुक'चे प्रकाशन
* स्मरणार्थ 'कुंभमेळा टपाल तिकीट'चे अनावरण
या सर्व ऐतिहासिक प्रसंगांचे साक्षीदार होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रपतींना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
पंचेंद्रियांना स्पर्श करणारी अनोखी निमंत्रण पेटी
राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आलेले निमंत्रण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शवणारी आकर्षक त्रिमितीय (Pop-up) कलाकृती उलगडते.
दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांच्या अनुभवांवर आधारित या संकल्पनेतून नाशिकचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरी नदीचे महात्म्य आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व अतिशय प्रभावीपणे रेखाटण्यात आले आहे.
आदिवासी सक्षमीकरण आणि स्थानिक समृद्धीचे दर्शन
या निमंत्रण संचात आदिवासी विकास विभागांतर्गत 'शबरी नॅचरल्स'च्या विविध नैसर्गिक उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुगंधित अगरबत्ती, पोषक भरडधान्यांपासून (Millets) बनवलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांची उत्पादने, बांबूच्या कलात्मक वस्तू आणि शुद्ध वनमध यांचा समावेश आहे. या उत्पादनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, निसर्गपूरक जीवनशैली आणि स्थानिक उद्योजकतेची ताकद अधोरेखित करण्यात आली आहे.
याशिवाय, महाराष्ट्राच्या वस्त्रसंस्कृतीचा मानबिंदू मानली जाणारी येवला पैठणी, नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतीक असणारे काळे मनुके व काजू, प्रसिद्ध नाशिकचा चिवडा, निवडक मिठाई आणि सुकामेवा या संचात समाविष्ट करून महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य-परंपरेची सुरेख झलक राष्ट्रपतींसमोर मांडण्यात आली.
प्रमुख उपस्थितांची उपस्थिती
राष्ट्रपती भवनातील या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा व कुंभमेळा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार हे उपस्थित होते.
तसेच नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.