नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑक्टोबर - नाशिक जिल्ह्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘जी राम जी’ योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात तब्बल ६४ हजार ५२७ विविध कामांचा जिल्हास्तरीय परिपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात जलसुरक्षा मजबूत होण्यासोबतच रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होणार आहेत.
जलसंधारणाच्या ६१ हजार कामांवर विशेष भर
प्रशासनाने तयार केलेल्या या आराखड्यात नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढवणाऱ्या कामांना प्रथम प्राधान्य दिले आहे. एकूण कामांपैकी ६१ हजार २२५ कामे ही केवळ जलसंधारणाची असून, उर्वरित ३ हजार ३०२ कामे दुष्काळ प्रतिबंधक स्वरूपाची आहेत.
यात प्रामुख्याने माती बांध, नालाबांध, सिमेंट व गॅबियन बंधारे, दगडी व भूमिगत बांध, शेततळी, वनतळी, सलग समतल चर (CCT), शोषखड्डे, विहिरींचे पुनर्भरण आणि नदी-तलावांचे पुनरुज्जीवन यांसारख्या कामांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दीर्घकाळासाठी सुटण्यास मदत होईल.
मालेगाव तालुक्यात सर्वाधिक कामे: तालुकानिहाय नियोजन
जिल्ह्यातील स्थानिक गरजांनुसार प्रत्येक तालुक्यात कामांचे वाटप करण्यात आले आहे:
* मालेगाव तालुका: सर्वाधिक २२,००५ कामे (यापैकी २० हजार कामे जलसंधारणाची)
* दिंडोरी: ५,२७६ कामे | त्र्यंबकेश्वर: ५,१६५ कामे
* बागलाण: ४,७०० कामे | सिन्नर: ४,१५० कामे
* येवला: ४,०८५ कामे | नांदगाव: ३,७०७ कामे
* कळवण: ३,४१५ कामे | पेठ: ३,२७६ कामे
* चांदवड: २,५६५ कामे | सुरगाणा: २,४६९ कामे
* इगतपुरी: २,४४८ कामे | देवळा: २,३४१ कामे
* निफाड: १,९७६ कामे | नाशिक तालुका: ६७० कामे
पशुधन, शेती आणि पायाभूत सुविधांना बळ
दुष्काळात पशुधनासाठी चारा-पाण्याची सोय करणे, जमिनीची धूप रोखणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्यामुळे शेतीची पाणीधारण क्षमता वाढेल.
ग्रामीण भागातील कुटुंबांना दुष्काळी परिस्थितीत रोजगाराचा मोठा आधार मिळण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, असा विश्वास उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी व्यक्त केला आहे.