नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑक्टोबर - प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिर परिसरात मुलास मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संतापलेल्या दोघा भावांनी थेट दुकानात घुसून ६१ वर्षीय दुकानदारावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी व्यावसायिकाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा सख्ख्या भावांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोग्या उर्फ तेजस पांडुरंग तेलंग आणि ऋतिक पांडुरंग तेलंग (दोघे रा. काळाराम मंदिराशेजारी, पंचवटी, नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दोन भावांची नावे आहेत. या प्रकरणी अनिल धनकुमार जैन (रा. कार्तिक स्वामी मंदिराशेजारी, नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकी काय आहे घटना?
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथिमक माहितीनुसार, फिर्यादी अनिल जैन यांचे कार्तिक स्वामी मंदिर परिसरात पुजा साहित्याची विक्री करणारे ‘जैन स्टोअर्स’ नावाचे दुकान आहे. सोमवारी (दि. १९) संशयित दोन भावांनी जैन यांच्या मुलाला कोणत्याही कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली होती.
वडिलांना जेव्हा या प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा सायंकाळी त्यांनी संशयितांकडे जाऊन मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या किरकोळ कारणावरून संशयित दोघे भाऊ प्रचंड संतापले. त्यांनी दुकानाबाहेर पडलेला सिमेंटचा जड ब्लॉक उचलला आणि थेट जैन यांच्या दुकानात प्रवेश केला.
डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवघेणा हल्ला
दुकानात घुसल्यानंतर संशयितांनी जैन यांना धक्काबुक्की व दमदाटी करत त्यांच्या डोक्यात तो सिमेंटचा ब्लॉक भयंकर पद्धतीने मारला. डोक्यात तीव्र आघात झाल्यामुळे अनिल जैन हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. जैन खाली पडल्यानंतरही संशयितांची मने भरली नाहीत, त्यांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्यात ६१ वर्षीय व्यावसायिक गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांत गुन्हा दाखल आणि तपास सुरू
या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित व्यावसायिक अनिल जैन यांच्या फिर्यादीवरून संशयित गोग्या उर्फ तेजस तेलंग आणि ऋतिक तेलंग यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अनिल सोर यांच्यामार्फत केला जात असून, आरोपींचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.