ईडीची मोठी कारवाई... नाशिकसह ६ शहरांत धाडी... दोन कंपन्यांचे तब्बल २०० कोटी जप्त...

Share:
Main Image
Last updated: 21-Oct-2026

 

ऑनलाईन डेस्क, (प्रतिनिधी) २१ ऑक्टोबर - शेअर बाजारामध्ये 'पंप अँड डंप' (Pump and Dump) या गैरव्यवहाराच्या माध्यमातून मोठा घोटाळा केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अत्यंत धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने ६ वेगवेगळ्या शहरांमधील तब्बल २९ ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली असून, दोन प्रमुख कंपन्यांच्या ट्रेडिंग खात्यांमधील तब्बल २०० कोटी रुपयांची रक्कम गोठवली (Freeze) आहे. या उच्चस्तरीय कारवाईमुळे आर्थिक व शेअर बाजार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI) द्वारे शेअर बाजारातील संशयास्पद फेरफार आणि हेराफेरीविरोधात काही काळापूर्वी मोहीम हाती घेण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासाचाच एक भाग म्हणून, नाशिकस्थित 'आर एम ड्रिप अँड स्प्रिंकलर सिस्टीम्स लिमिटेड' (RMDSSL) आणि सुरतस्थित 'आर अँड बी डेनिम्स लिमिटेड' (R&B Denims Ltd.) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून हा शेअर घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सेबीच्या कारवाईनंतर आता ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ही धडक कारवाई केली आहे.

६ शहरांत २९ ठिकाणी धाडी

घोटाळ्याचे सत्य समोर आणण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने गेल्या १६ ऑक्टोबर रोजी देशातील ६ प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी छापे सत्र राबवले. यामध्ये अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, भावनगर, मुंबई आणि नाशिक या शहरांमधील एकूण २९ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यालय, त्यांच्या प्रवर्तकांच्या निवासस्थानांव्यतिरिक्त कमी किमतीत शेअर्सचे वाटप झालेल्या व्यक्तींची घरे, स्टॉक ब्रोकिंग व फायनान्स कंपन्यांचे कार्यालय आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या शेअर्सचा प्रचार करणाऱ्या संशयितांच्या ठिकाणांचा समावेश होता.

कसा रचला गेलाय घोटाळा? (PMLA तपासातील खुलासे)

ईडीच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत या दोन्ही कंपन्यांनी काही निवडक व्यक्ती आणि संस्थांना ३.५ कोटींहून अधिक शेअर्स आणि कनवर्टेबल वॉरंट्सचे वाटप केले होते. या शेअर्ससाठी आलेला मोठा निधी हा काही मोजक्याच परस्परसंबंधित व्यक्ती, कंपन्या आणि कर्जदारांकडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरच्या महिन्यांत या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कृत्रिमरीत्या सातत्याने वाढवण्यात आले, तर हे शेअर्स मोजक्याच लोकांकडे कायम ठेवण्यात आले होते.

डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान, 'मल्टीबॅगर स्टॉक्स' (Multibagger Stocks) अशा आकर्षक नावांच्या व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुप्सच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना दररोज शेअर्स खरेदी करण्यासाठी खोट्या टिप्स किंवा शिफारसी पाठवण्यात आल्या. हे संपूर्ण रॅकेट गुजरातच्या भावनगरमधून चालवले जात होते, परंतु यासाठी हरियाणा आणि मुंबई येथील व्यक्तींच्या नावावर बेकायदेशीररीत्या घेतलेल्या सिम कार्डचा वापर करण्यात आला होता. या बनावट टिप्सच्या जाळ्यात अडकून अनेकसामान्य गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करण्यासाठी पुढे आले, ज्यामुळे या शेअर्सचे भाव आणि व्हॉल्यूम प्रचंड प्रमाणात वाढले.

गुंतवणूकदारांची फसवणूक आणि २००० कोटींची जप्ती

जेव्हा शेअर्सच्या किमती शिगेला पोहोचल्या आणि बाजारात मोठी खरेदीची लाट निर्माण झाली, तेव्हा मूळ लाभाधिकारी असलेल्या व्यक्तींनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांनी आपल्या मालकीचे शेअर्स मोठ्या संख्येने सामान्य गुंतवणूकदारांच्या माथी मारून (Dump) कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला आणि सामान्यांची फसवणूक केली. या संपूर्ण गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत ईडीने तपासादरम्यान 'अफ्लुएन्स जेम्स', 'कावा एचयूएफ' आणि 'कोमलाय कन्सल्टन्सी' यांसारख्या कौटुंबिक आणि संबंधित लाभाधिकाऱ्यांच्या क्लस्टर्सची ओळख पटवली आहे. या प्रकरणी कठोर पावले उचलत ईडीने या दोन कंपन्यांच्या खात्यातील २०० कोटी रुपयांची रक्कम गोठवली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

 

Comments

No comments yet.