नाशिक, (प्रतिनिधी) २० ऑक्टोबर - अज्ञानाचा फायदा घेत, आजारपण बरे करण्याचे आमिष दाखवून आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने एका महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमधील एका भोंदूबाबाविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, या कारवाईमुळे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
प्राप्त माहितीनुसार, पनवेल येथे राहणाऱ्या एका महिलेला बऱ्याच काळापासून अस्थमाचा (दम्याचा) त्रास होत होता. यादरम्यान, तिला नाशिक येथील गंगापूर शिवारात राहणारा अरुण धोंडू पाटील या भोंदूबाबाच्या कथित ‘दैवी शक्ती’बद्दल व चमत्कारांबद्दल माहिती मिळाली. या भोंदूने पीडित महिला आणि तिच्या पतीचा विश्वास संपादन करण्यासाठी थेट पनवेलला स्वतःची गाडी पाठवली. यानंतर दोघा पती-पत्नीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्यांना अत्यंत गूढ आणि संशयास्पद हालचालींमध्ये नाशिक येथे आणले गेले.
नाशिकमध्ये आणून त्यांच्यावर अघोरी पूजा करण्यात आली आणि पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना पनवेलला सोडण्यात आले. दुसऱ्यांदाही असाच प्रकार घडवण्यात आला. या दिखाव्यामुळे महिलेला आपल्या आजारपणाचा गुण आल्याचा आभास निर्माण झाला आणि या भोंदूवर त्यांचा अंधविश्वास बसला.
अघोरी पूजा आणि साडेसात लाखांचा गंडा
विश्वास बसल्यानंतर या भोंदूबाबाने आपली पाळेमुळे अधिक घट्ट करत पीडितेला 'पैशाचा पाऊस पाडून देतो,' असे लालच दाखवले. यासाठी त्याने पीडितेला तिच्या मासिक पाळीच्या काळातील रक्ताने माखलेले कपडे सोबत आणण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे, पनवेलहून पुन्हा त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकमधील गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ आणले गेले.
तिथे एका निर्जन किंवा गुप्त ठिकाणी अतिशय भयंकर आणि अघोरी पूजा मांडण्यात आली. पूजेच्या नावाखाली पीडितेला तिच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगून एक पांढरे, पारदर्शक व पातळ वस्त्र नेसवण्यात आले. त्यानंतर तिच्या अंगावर पाणी ओतण्यात आले. मासिक पाळीच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांची पूजा मांडण्यात आली. मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का यांसारख्या साहित्याचा वापर करून सुमारे दोन तास चाललेली ही अघोरी पूजा भोंदूबाबाने मंत्रोच्चार करत पार पाडली. अंधश्रद्धेची परिसीमा गाठत या पूजेदरम्यान एका बोकडाचा बळीही देण्यात आला. "घरी परत गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल," असे सांगत पुन्हा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना पनवेलला पोहोच करण्यात आले. या तिन्ही पूजाविधींच्या नावाखाली भोंदूने त्यांच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर तब्बल साडेसात लाख रुपये उकळले.
फसवणूक लक्षात आल्यावर अंनिसची धाव
घरी परतल्यानंतर कितीही दिवस वाट पाहिली तरी प्रत्यक्षात कोणताही पैशाचा पाऊस पडला नाही आणि महिलेचे आजारपणही बरे झाले नाही. आपली फैसे आणि श्रद्धेच्या नावाखाली क्रूर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने आपले पैसे परत मिळवण्यासाठी भोंदूबाबाकडे तगादा लावला. मात्र, या भोंदूने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
अखेर या प्रकरणाची कुणकुण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) नाशिकच्या कार्यकर्त्यांना लागली. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आणि घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती व भोंदूचे काळे कारनामे त्यांच्यासमोर मांडले. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी तातडीने दखल घेत भोंदू अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायदा (महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व नायनाट अधिनियम, २०१३) तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांअन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांचे आणि अंनिसचे महत्त्वाचे आवाहन
या प्रकारानंतर पोलीस प्रशासन आणि अंनिसच्या वतीने नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. या भोंदूबाबाने किंवा इतर कोणत्याही भोंदूने दैवी व अघोरी शक्ती, मंत्र-तंत्र किंवा पूजाविधीच्या नावाखाली पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्यास, संबंधित पीडितांनी न घाबरता पुढे यावे आणि गंगापूर पोलीस ठाण्यात किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी अशा भोंदूबाबांच्या भूलथापांना आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहनही अंनिसच्या वतीने करण्यात आले आहे.
या संपूर्ण कारवाईमध्ये आणि यशस्वी पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्तरी, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, कोमल वर्दे, डॉ. मंगेश कादे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अंधश्रद्धेच्या विरोधातील हा लढा समाजहिताचा असून, अशा भोंडूंविरोधात प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी स्थानिक अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.