नाशिक, (प्रतिनिधी) २२ जानेवारी - शहरातील आडगाव परिसरातील सद्भावना हाउसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी (दि. २१) दुपारी रक्ताचा नातं कलंकित करणारी धक्कादायक घटना घडली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाले असून, लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. संदीप विजय गायकवाड (वय ३३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत संदीप आणि संशयित आरोपी अरविंद गायकवाड हे दोघेही नाशिक ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांची मुले आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सद्भावना हाउसिंग सोसायटीतील त्यांच्या राहत्या घरी दोन्ही भावांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार खडाजंगी झाली. वादाचे स्वरूप इतके वाढले की, रागाच्या भरात अरविंदने घरातील चाकू काढून संदीपवर सपासप वार केले. या हल्ल्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला.
नशेत होता आरोपी
प्राथमिक माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा संशयित आरोपी अरविंद हा नशेच्या अंमलाखाली होता. घरात आई असतानाच दोन्ही भावांमध्ये हा वाद सुरू झाला आणि काही क्षणातच त्याचे रूपांतर हत्येत झाले. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी अरविंद गायकवाड याला ताब्यात घेतले आहे.
| आईला नियमित तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन जाण्याच्या वादातून दोन भावांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली ही घटना आडगाव शिवारात घडली |
कौटुंबिक वादातून महिनाभरात तिसरा खून
नाशिक शहरात जानेवारी महिन्यात हत्येची ही तिसरी घटना असून, विशेष म्हणजे या तिन्ही घटना कौटुंबिक वादातून घडल्या आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली असून कौटुंबिक नातेसंबंधांमधील वाढता हिंसाचार चिंतेचा विषय ठरत आहे.
पुढील तपास सुरू
"या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण आणि वादाची ठिणगी कशामुळे पडली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत."
— उमेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव पोलीस ठाणे.