मॅट्रिमोनी साइटवरून तरुणीला जाळ्यात ओढले... विवाहित तरुणाकडून वारंवार बलात्कार... ब्लॅकमेलिंगचा असा झाला पर्दाफाश...
Share:
Last updated: 16-Oct-2026
नाशिक (प्रतिनिधी), १६ ऑक्टोबर २०२६ -
मॅट्रिमोनी वेबसाइटवर नोंदणी करणे एका विवाहूत्सुक तरुणीसाठी अत्यंत वेदनादायी ठरले आहे.
आधीच विवाह झालेला असताना एका तरुणाने आपली पहिली माहिती लपवून ठेवत मॅट्रिमोनीच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधला.
त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे नाटक करून आणि मंदिरात दुसरा विवाह करत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीष लक्ष्मण पारखे (मूळ रा. भुसावळ, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
* मॅट्रिमोनी साईटवर ओळख:
२०२४ मध्ये विवाहूत्सुक असलेल्या पीडित तरुणीने एका मॅट्रिमोनी वेबसाइटवर आपली नोंदणी केली होती. यादरम्यान संशयित मनीष पारखे तिच्या संपर्कात आला.
* नोकरीचे कारण आणि भेटीगाठी:
संशयित नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगून तरुणीच्या संपर्कात आला. मुलीनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दोघांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद वाढला आणि भेटीगाठी सुरू झाल्या.
* पहिले लग्न लपवले:
संशयिताने त्याच्या पहिल्या विवाहाबाबत पूर्णपणे गोपनियता पाळली आणि कोणतीही माहिती दिली नाही. स्वतः अविवाहित असल्याचे भासवून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला.
विवाह आणि ब्लॅकमेलिंगचा सिलसिला
विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
एवढेच नव्हे तर, शहरातील एका मंदिरात नेऊन तिच्याशी बोगस पद्धतीने दुसरा विवाहही केला.
मात्र, काही कालावधीनंतर संशयिताच्या पहिल्या विवाहाचे सत्य बाहेर आले आणि त्याचे बिंग फुटले.
तरुणीने या प्रकाराबाबत त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, दोघांचे अशील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरू केले.
तरुणीने त्याच्यापासून दुरावण्याचा प्रयत्न केला असता, तो सतत संपर्क साधून मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागला.
अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. तिच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मॅट्रिमोनी साईटवर फसवणूक करणाऱ्या अशा भामट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.