नाशिक, (प्रतिनिधी) २१ जानेवारी - भारतीय वायू दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून होणाऱ्या एरो शोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाहतूक, आरोग्य, पाणी आणि स्वच्छतेचे काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
मंत्री महाजन यांनी आज सकाळी गंगापूर धरण परिसरास भेट देऊन एरो शो च्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, नाशिकमध्ये होणारा एरोबॅटिक शो अविस्मरणीय होणार आहे. यामुळे सर्व विभागांनी सतर्कता बाळगावी. हा कार्यक्रम
सुंदर झाला पाहिजे. आवश्यकतेनुसार परिसरातील ग्रामस्थांची मदत घ्यावी. या शोसाठी शाळकरी मुलांना प्राधान्य द्यावे. गर्दीचे नियोजन करावे. आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाशिकमध्ये प्रथमच असा शो होत आहे. विविध विभाग सहभागी झाले आहेत. हा शो यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात आली आहे. गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय वाहनतळ तयार केले आहेत. याचठिकाणी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. या शो मुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी पोलीस बंदोबस्ताची सविस्तर माहिती दिली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास पाटील (निवृत्त) यांनी सुरक्षेसाठी सुरू असलेल्या नियोजनाची, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीराजपूत यांनी सर्वंकष तयारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या सर्वंकष तयारीची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.