नाशिक, (प्रतिनिधी) १९ जानेवारी - शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसह नफ्याची रक्कम अदा करूनही एकाने ८० लाखाच्या खंडणीची मागणी करीत ट्रेंडिग व्यावसायीकाच्या पित्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत संशयिताने थार कारही ओढून नेली असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन अशोक देशमुख (रा. शनि मंदिराजवळ, ध्रुवनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत तेजस सुरेश चांदवडकर (रा.शिवशक्ती,त्र्यंबकराज नगर ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चांदवडकर यांचा शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिगचा व्यवसाय आहे.
संशयित देशमुख याने चांदवडकर यांच्या माध्यमातून एक कोटी दहा लाख रूपयांची गुंतवणुक शेअर मार्केटमध्ये केली होती. त्या मोबदल्यात १ कोटी ४० लाख ३० हजाराची रक्कम त्यास गुंतवणूक आणि नफ्यासह अदा करण्यात आली आहे. मात्र यानंतरही त्याने ८० लाख रूपयांचा दावा करीत हे कृत्य केले आहे.
संशयिताने धाकदपटशा करीत चांदवडकर यांची गाडी बळजबरीने आढून नेली आहे. एवढ्यावरच न थांबता संशयिताकडून पून्हा ८० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी लावून धरली आहे. चांदवडकर यांचे वडिल सुरेश चांदवडकर हे रविवारी (दि.१८) नाशिकरोड भागात गेले होते.
दुपारच्या सुमारास ते बिटको कॉलेज भागातील इंडियन ओव्हरसिस बँक परिसरात जात असतांना संशयिताने त्यांना गाठले. यावेळी संशयिताने शिवीगाळ व धाकदडपशा करीत त्यांना बळजबीरने आपल्या कारमध्ये बसवून अपहरण केले.
चांदवडकर यांच्या वडिलांना छत्रपती संभाजी रोड भागात खंडणीसाठी धमकावण्यात आले असून त्यामुळे हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.