नाशिकमध्ये तोतया पोलिसांचा सुळसुळाट... मदतीचा बहाणा करत पाथर्डी शिवारात...

Share:
Main Image
Last updated: 20-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिसांनी डोके वर काढले असून, पोलीस असल्याची बतावणी करत एका ५३ वर्षीय नागरिकाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या हातोहात लांबविल्याची धक्कादायक घटना पाथर्डी शिवारात घडली आहे. मदतीचा बनाव करून चोरट्यांनी तब्बल १ लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक रामचंद्र दोंदे (वय ५३, रा. राजवाडा, पाथर्डी गाव, नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दोंदे हे शुक्रवारी (दि. १८) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घराकडून वडनेर रोडने पाथर्डी गावाच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात भामट्यांनी त्यांची वाट अडवली.

"आम्ही पोलीस आहोत, पुढे तपासणी सुरू आहे," अशी बतावणी करत भामट्यांनी दोंदे यांच्याशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, "दागिने अंगावर घालून फिरणे सुरक्षित नाही, ते काढून रुमालात बांधून ठेवा," असा सल्ला देत चोरट्यांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. दोंदे यांनी हातातील सोन्याच्या अंगठ्या काढताच, भामट्यांनी हातचलाखी करून सुमारे १ लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या स्वतःकडे ठेवून घेत तेथून पोबारा केला.

Advertisement

काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोंदे यांनी तातडीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार पगारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बडदे नगरमध्ये भरदिवसा घरफोडी

सिडकोतील बडदेनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुशल भालचंद्र येवले (रा.साईसमर्थ हाईटस,इच्छामणी कॉलनी बडदेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. येवले कुटुंबीय शुक्रवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास किरकोळ कामासाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख २१ हजार ४०० रूपये किमतीचे सोन्याचादीचे अलंकार चोरून नेले. सहाय्यक निरीक्षक बागुल या गुह्याचा तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.