नोकरीच्या नावाखाली पैसे उकळले... मागणी करताच लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 20-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - नाशिक महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय बेरोजगार व्यक्तीची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अनेक महिने उलटूनही नोकरी न मिळाल्याने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर संशयिताने भररस्त्यात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीच्या नावाखाली उकळले पैसे

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिडको परिसरातील गणेशनगर येथे राहणारे आधार नथ्थू बाविस्कर (वय ४०) हे रोजगाराच्या शोधात होते. यादरम्यान संशयित गणेश लक्ष्मण निकम याच्याशी त्यांची ओळख झाली. संशयित निकम याने नाशिक महापालिकेत आपली मोठी ओळख असल्याचे भासवून बाविस्कर यांना मनपात पक्की नोकरी मिळवून देण्याची हमी दिली. या नोकरीच्या मोबदल्यात संशयिताने त्यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली.

पैसे मागताच वाद आणि जीवघेणा हल्ला

पैसे देऊनही अनेक महिने काम न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे बाविस्कर यांच्या लक्षात आले. त्यांनी संशयिताकडे विचारणा सुरू केली. गुरुवारी (दि. १७) रात्रीच्या सुमारास बाविस्कर यांनी निकम याला द्वारका परिसरातील सुयोग ट्रॅव्हल्सजवळ गाठले. यावेळी बाविस्कर यांनी, "माझ्या कामाचे काय झाले? जर नोकरी लागत नसेल, तर माझे दिलेले पैसे परत करा," असा जाब विचारला.

Advertisement

पैसे परत मागितल्याचा प्रचंड राग आल्याने संशयित गणेश निकम याने भररस्त्यात बाविस्कर यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "तुला पैसे परत मिळणार नाहीत, तुला जे करायचे ते कर," अशी खुली दमदाटी निकमने केली. वाद विकोपाला जाताच निकमने जवळ असलेला लोखंडी रॉड काढून बाविस्कर यांच्यावर सपासप वार केले. धारदार शस्त्राने झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे बाविस्कर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.

भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाविस्कर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत अधिकृत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित गणेश लक्ष्मण निकमविरुद्ध फसवणूक, मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रेहरे करत असून, पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाथर्डीतील जुगार अड्डा उद्ध्वस्त

पाथर्डी शिवारात राजरोसपणे सुरू असलेला जुगार अड्डा शहर पोलीसांनी उध्वस्त केला. सात जुगारींना बेड्या ठोकत या कारवाईत ३७ हजाराच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत रामदास जाधव (रा.गणराज कॉलनी इंदिरानगर), रामकृष्ण रामदास बोडके (रा.खोडेमळा शिवाजीचौक), देवेश रमेश गांगुर्डे (रा.श्रीराज सारथी अपा.इंदिरानगर), विशाल राजेंद्र कोरडे (रा.प्रभात कॉलनी खोडेमळा सिडको), दिपक दिनकर भोगे (रा.गणेश चौक सिडको), श्याम मोहनलाल इंदोरा (रा.चर्च मागे इंदिरानगर) व भुषण पांडूरंग जोरवर (रा.परब नगर इंदिरानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. याबाबत अंमलदार पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पाथर्डी शिवारातील मॅग्नो हॉटेल परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१८) पथकाने छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ३७ हजार ६२० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून हवालदार पवार या गुह्याचा तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.