नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरासाठी अहोरात्र कार्यरत राहून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘फ्रंटलाइन वर्कर्स’च्या योगदानाला सलाम करण्यासाठी रेडिओ मिर्ची ९८.३ नाशिकच्या वतीने ‘मिर्ची कुंभदूत २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर २०२६ रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
‘नाशिकच्या खऱ्या नायकांना मानाचा मुजरा!’
‘नाशिकच्या खऱ्या नायकांना मानाचा मुजरा!’ या प्रेरणादायी संकल्पनेवर हा उपक्रम आधारित आहे. याद्वारे स्वच्छता राखणारे सफाई कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस, आपत्त्कालीन प्रसंगी धावून जाणारे अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी, ऑटोरिक्षा चालक तसेच विविध क्षेत्रांत अहोरात्र सेवा देणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचा सन्मान केला जाणार आहे.
दर बारा वर्षांनी एकदा येणारा सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेचा सोहळा आहे. या पर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनासह हजारो कर्मचारी कंबर कसून काम करत असतात. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याची समाजासमोर दखल घेणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
कुंभ स्मृतीचिन्हाने सन्मान
या भव्य सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात निवडक फ्रंटलाइन वर्कर्सना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच, नाशिकच्या सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था व संघटनांना विशेषत्वाने ‘कुंभ स्मृतीचिन्ह’ प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.
कार्याची माहिती एका दृष्टीक्षेपात:
कार्यक्रम: मिरची कुंभदूत २०२६ (सन्मान सोहळा)
दिनांक: २३ सप्टेंबर २०२६
वेळ: सायंकाळी ६:०० वाजता
स्थळ: हॉटेल ट्रीट (Hotel Treat), गोविंद नगर, नाशिक.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यास नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र सानप यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याची शान वाढवणार आहे.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
‘मी नाशिकचा… कुंभमेळा माझा!’ या स्वाभिमानी भावनेतून नाशिकच्या तमाम नागरिकांनी, विविध संस्था व संघटनांनी या उपक्रमाशी जोडून घ्यावे, असे आवाहन रेडिओ मिर्ची ९८.३ चे सेल्स हेड सोमनाथ शिंदे यांनी केले आहे.