एमजी रोडवर खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी... कडे आणि विटेने हल्ला... दोघे जखमी...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - खेळावरून बदनामी केल्याच्या जुन्या रागातून खेळाडूंमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना शहरातील एम. जी. रोड परिसरात घडली आहे. या हाणामारीत हातातील धातूचे कडे आणि विटेने हल्ला करण्यात आल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शुभम जाधव व त्याचे इतर तीन साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश शंकर मिरचापुरे (वय २४, रा. पवारवाडी, जेलरोड, नाशिक) या खेळाडूने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यश मिरचापुरे व त्याचे मित्र शुक्रवारी (दि. १८) दुपारच्या सुमारास एम. जी. रोड परिसरातील यशवंत व्यायामशाळा येथे आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. खेळ संपल्यानंतर दुपारच्या सुमारास संशयित शुभम जाधव व त्याच्या साथीदारांनी मिरचापुरे याला रस्त्यात अडवले. "तू खेळण्यावरून माझी सगळीकडे बदनामी केली आहे, आता तुला जिवंत सोडणार नाही," अशी दमदाटी करत संशयितांनी थेट वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद विकोपाला जाताच संशयितांनी यश मिरचापुरे याच्यावर अचानक हल्ला चढवला. संशयिताने हातातील जड कड्याने मिरचापुरे याच्या तोंडावर आणि डोक्यात जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. आपल्या मित्रावर हल्ला झाल्याचे पाहून सौरभ नावाचा मित्र त्याला वाचवण्यासाठी धावून आला असता, संशयितांनी जमिनीवर पडलेली वीट उचलून थेट सौरभच्या डोक्यात भिरकावून मारली. या हल्ल्यात सौरभही गंभीर जखमी झाला.

Advertisement

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, मिरचापुरे याच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी शुभम जाधव व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध मारहाण व दमदाटीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकुंद निंबाळकर करत आहेत.

नाशकात तडीपार जेरबंद

 हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई वडाळागावातील मदिना चौक भागात करण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदाशिव उर्फ शिव पिराजी गायकवाड (३८ रा. म्हाडा वसाहत वडाळागाव) असे कारवाई करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. याबाबत अंमलदार योगेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यास रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्या विरोधात हद्दपारीची कारवाई केलेली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षासाठी तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना शुक्रवारी (दि.१८) तो वडाळागावातील मदिना चौकात मिळून आला. या गुह्याचा तपास हवालदार परदेशी करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.