नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहन पार्क करत असताना सुरक्षारक्षकानेच अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयित सुरक्षारक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ अरुण चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पीडित महिला आणि संशयित हे दोघेही एकाच इमारतीत वास्तव्यास असून, संशयित तेथे वॉचमन म्हणून काम करतो.
पीडित महिला गुरुवारी (दि. १७) रात्री १० वाजेच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये आपले वाहन पार्क करत असताना हा प्रकार घडला. सोसायटीच्या वॉचमन रूमजवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. संशयित सौरभ चौधरी याने या ठिकाणी मोठ्या आवाजात अश्लील गाणे लावले होते. महिला पार्किंगमध्ये येताच संशयिताने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली आणि तिचा विनयभंग केला.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सौरभ चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार गुंड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकानेच असे कृत्य केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
तरुणाची आत्महत्या
दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना भागात राहणाºया २८ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश धर्मा गांगुर्डे (रा.पारस मेडिकल गल्ली मायको दवाखाना) असे मृत युवकाचे नाव आहे. गांगुर्डे याने गुरूवारी (दि.१७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ योगेश गांगुर्डे याने त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना शुक्रवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. हवालदार सानप या प्रकरणाचा तपास करीत आहेत.