बिबट्या की दुसरा वन्यजीव? तीन पिंजरे लावून सापळा... थर्मल ड्रोनने दिवस-रात्र शोधमोहीम सुरू...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

सिन्नर, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - तालुक्यातील माळेगाव येथील 'एचपी गॅस' बॉटलिंग प्लांट परिसरात वन्यजीवाचा संभाव्य वावर समोर आल्याने स्थानिक नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पावले उचलत परिसरात कडक दक्षता सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीन पिंजरे लावण्यात आले असून, सामान्य तसेच आधुनिक थर्मल ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर २४ तास करडी नजर ठेवली जात आहे.

तीन पिंजरे लावून सापळा

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचपी गॅस परिसरात वन्यजीव दिसल्याची माहिती मिळताच दि. १४ सप्टेंबर रोजी सिन्नर वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी आणि सुरक्षा प्रभारी वाघुळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून तातडीने दोन पिंजरे लावून तेथे कामगारांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर दि. १५ सप्टेंबर रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडगुजर यांच्यासह वन पथकाने संयुक्त पाहणी करत वाढीव मागणीनुसार आणखी एक पिंजरा बसवला. सध्या परिसरात एकूण तीन पिंजरे लावून वन्यजीवाला जेरबंद करण्याची तयारी करण्यात आली आहे.

Advertisement

थर्मल ड्रोनने दिवस-रात्र शोधमोहीम

दि. १६ सप्टेंबर रोजी सहायक वनसंरक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. रात्रीच्या अंधारातही हालचाली टिपणाऱ्या थर्मल ड्रोनसह सामान्य कॅमेरा ड्रोनच्या साहाय्याने परिसराची हवाई पाहणी करण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शोध घेतला असता, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमच्या भागात वन्यजीवाचे बछडे आहेत का, याची विशेष पडताळणी करण्यात आली. संभाव्य धोका टाळण्यासाठी दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी वन विभाग आणि एचपी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे परिसरातील सीमाभिंतीवर संरक्षक कुंपणाचे (Fencing) काम पूर्ण केले.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; वन विभागाचे आवाहन

वन्यजीव आणि मानवातील संभाव्य संघर्ष रोखण्यासाठी नाशिक टीटीसी केंद्राच्या 'इको-इको' (Eco-Eco) संस्थेमार्फत येत्या २१ सप्टेंबर रोजी विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि कामगारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे. परिसरात वन्यजीव दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, फोटो काढणे अथवा त्याला डिवचणे टाळावे. वन्यजीवाची हालचाल दिसताच क्षणाचाही विलंब न करता वन विभागाशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन वन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.