नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - गणेशवाडी परिसरातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एका नागरिकाचा मोबाईल लंपास केला. त्यानंतर त्या मोबाईलमधील 'फोनपे'चा पिनकोड बदलून बँक खात्यातील तब्बल १ लाख ९ हजार ९९२ रुपयांची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यांवर वर्ग करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशीकांत चंद्रकांत धाकड (वय – रा. गामणे मळा, मखमलाबाद रोड, नाशिक) हे रविवारी (दि. १३) गणेशवाडी येथील फुलबाजार परिसरात फुले खरेदी करण्यासाठी गेले होते. बाजारातील गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल लांबवला.
मोबाईल चोरल्यानंतर भामट्यांनी त्याचा गैरवापर करत मोबाईलमधील 'फोनपे' ॲप्लिकेशनचा पिनकोड बदलला. त्यानंतर धाकड यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ९ हजार ९९२ रुपयांची रक्कम उत्तरप्रदेशातील बरेली येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत असलेल्या करण गुप्ता याच्या खात्यावर तसेच इतर विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन ट्रान्सफर करून परस्पर काढून घेतली.
आपल्या बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास येताच धाकड यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
खिशातील पाकीट लांबवले
देवपूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या ७६ वर्षीय वयोवृध्दाच्या खिशातील पाकिटावर चोरट्यांनी डल्ला मारला. या पाकिटात १० हजार दोनशे रूपयांची रोकड होती. ही घटना रविवार कारंजा भागात घडली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामराव कचरू गावले (रा.घाडगेनगर मखमलाबादरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गावले बुधवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास रविवार कारंजा भागात आले होते. सुगंधी अगरबत्ती दुकानात ते देवपुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. गर्दीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिट हातोहात लांबविले. या पाकिटात १० हजार २०० रूपयांची रोकड व महत्वाचे कागजपत्र होते. हवालदार बागुल या गुह्याचा तपास करीत आहेत.