कुंभमेळा ध्वजारोहणाचा मुहूर्त ठरला... कुणाच्या हस्ते होणार? अशी राहणार जय्यत तयारी...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याची नांदी ठरणाऱ्या येत्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी अत्यंत सूक्ष्म नियोजनातून करावी. सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून प्रत्यक्ष कामांना वेग द्यावा. कामांमध्ये कोणतीही शिथिलता किंवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट व कडक निर्देश राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, कुंभमेळा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. या महत्त्वपूर्ण बैठकीला महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह साधू-महंत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीची शक्यता; चोख सुरक्षेचे आदेश

पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ऐतिहासिक अशा ध्वजारोहण सोहळ्यासाठी महामहीम राष्ट्रपती महोदयांसह अनेक राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत कडेकोट आणि परिपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. सोहळ्याच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, स्वतंत्र व प्रशस्त वाहनतळ, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन आरोग्य यंत्रणा आणि चोवीस तास स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.

३५ हजार कोटींची विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

Advertisement

सिंहस्थ महाकुंभमेळा हा पूर्णपणे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने संपन्न झाला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात आणि परिसरात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा व विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून, ही सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सांस्कृतिक कार्यक्रम, 'कुंभ गीत' आणि रोषणाई

प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रारंभी कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती दिली. रामकुंड, कुशावर्त तीर्थ तसेच नील पर्वत परिसरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने भव्य गोदावरी आरती, दिव्य संध्या, आकर्षक विद्युत रोषणाई, दीपप्रज्वलन, विशेष 'कुंभ गीत' आणि शंखनाद यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन प्रस्तावित आहे. याशिवाय कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट आणि कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून सिंहस्थाची माहिती जागतिक स्तरावर पोहोचवली जाणार आहे.

साधू-महंत व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश

बैठकीत भाविकांच्या सोयीसाठी तात्पुरती वस्त्रांतरगृहे, फिरती स्वच्छतागृहे, मदत व माहिती केंद्रे, उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था आणि पुरेशा निवासाची सोय करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी देवी गडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्ती, बळकटीकरण आणि वाहनतळ नियोजनाला प्राधान्य देण्याची मागणी साधू-महंत व लोकप्रतिनिधींनी केली. या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

या बैठकीस श्री महंत हरिगिरीजी महाराज, महंत रवींद्रपुरी महाराज, महंत माधवदास महाराज राठी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, मनोज थेटे, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, धर्मादाय सहआयुक्त तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष न्या. सोनुने, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, त्र्यंबकेश्वर मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.