नाशिकरोड बसस्थानक ३ महिने पूर्णपणे बंद... ‘सिटीलिंक’ बसेसचे मार्ग व थांबे बदलले...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १९ सप्टेंबर - नाशिक शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात ‘सिटीलिंक’ (Citilinc) बस सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नाशिकरोड बसस्थानकात सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हे बसस्थानक पुढील तीन महिन्यांसाठी पूर्णपणे रिक्त (बंद) केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सिटीलिंक बसेसच्या फेऱ्या, थांबे आणि मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

नाशिक शहर पोलीस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भातील अधिकृत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. हे नवे निर्बंध आणि बदल २१ सप्टेंबर २०२६ पासून ते २० डिसेंबर २०२६ पर्यंत म्हणजेच तीन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहेत.

काँक्रीटीकरणासाठी बसस्थानक ३ महिने रिक्त

नाशिकरोड येथील मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था दूर करून प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे दर्जेदार काँक्रीटीकरणाचे काम केले जाणार आहे. या कामासाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे बसस्थानकातून बसेसची ये-जा पूर्णपणे थांबवणे गरजेचे होते. त्यानुसार, नाशिक महानगर परिवहन महामंडळाने (सिटीलिंक) फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शहर वाहतूक शाखा (युनिट-४) यांनी ना-हरकत दिल्यानंतर वाहतूक पोलिसांनी ही सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

प्रमुख मार्गांवरील बस फेऱ्यांचे सुधारित नियोजन

नवीन अधिसूचनेनुसार रेल्वे प्रवासी, नियमित प्रवासी आणि नोकरदारांची सोय लक्षात घेऊन खालीलप्रमाणे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे:

नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते त्र्यंबकेश्वर (मार्ग क्र. २४५ व १४५) :

या मार्गावर एकूण ३० बसेसच्या माध्यमातून तब्बल १८८ फेऱ्या चालविल्या जातील. या सर्व बसेस थेट नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथून सुटतील आणि परत येतील.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते दिंडोरी (मार्ग क्र. २१०) :

दिंडोरीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बसेससाठी १५ बसेस उपलब्ध असतील आणि त्यांच्या १२४ फेऱ्या थेट रेल्वे स्टेशनवरून चालवल्या जातील.

तपोवन ते सिन्नर फेरी (मार्ग क्र. १४६) :

या मार्गावर १५ बसेसच्या ४४ फेऱ्या होतील.

जाण्याचा मार्ग : बिटको चौकापासून पुढे नाशिकरोड पोलीस ठाणे – विभागीय आयुक्त कार्यालय टी पॉईंट – उड्डाणपूल अप रॅम्पवरून सिन्नर फाटामार्गे सिन्नरकडे.

Advertisement

येण्याचा मार्ग : सिन्नर फाटा – मारुती मंदिर – उड्डाणपूल डाऊन रॅम्प – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बिटको चौक – दत्तमंदिर चौकमार्गे पुढे.

शहरातील इतर उर्वरित सर्व फेऱ्या (५०१ फेऱ्या) :

शहराच्या अंतर्गत भागात धावणाऱ्या इतर सर्व बसेस आता नाशिकरोड सिटीलिंक बस आगार (डेपो) येथून सुटतील.

आगारातून शहराकडे येताना : नाशिकरोड सिटीलिंक आगार – सिन्नर फाटा – उड्डाणपूल डाऊन रॅम्प – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बिटको चौक – दत्तमंदिर चौकमार्गे शहरात प्रवेश करतील.

शहरातून आगाराकडे जाताना : दत्तमंदिर चौक – सरळ उड्डाणपुलावरून सिन्नर फाटा – पुढे नाशिकरोड येथील सिटीलिंक आगारात पोहोचतील.

रेल्वे प्रवाशांसाठी २४ तास विशेष बस सुविधा!

मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची व रात्रीच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे:

पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी खास सोय :

पंचवटी एक्सप्रेसने रात्री ९:४५ वाजता नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना शहरात पोहोचवण्यासाठी विविध मार्गांवरील ५ बसेस एकाच वेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर तैनात असतील आणि तिथून विविध भागांत मार्गस्थ होतील.

रात्री धावणाऱ्या गाड्यांसाठी सेवा :

रात्रीच्या वेळी रेल्वेने नाशिकरोड स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना शहरात सुरक्षितपणे जाता यावे, यासाठी ५ बसेस रात्रभर अखंडपणे रेल्वे स्टेशनवरून सुरू राहतील.

दिशादर्शक फलक आणि वॉर्डन नेमण्याचे निर्देश; उल्लंघनावर कारवाई

प्रवाशांचा कोणताही गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये म्हणून तपोवन व सिन्नर फाटा आगार व्यवस्थापकांना प्रवाशांच्या माहितीसाठी प्रतिनिधी नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाच्या थांब्यांवर मार्गदर्शक व सूचना फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या किंवा ठरवून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त अनधिकृत थांबा घेणाऱ्या बस चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५/१७७, १२२/१७७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी दिला आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.