केशव खेडकर, (नाशिक) १९ सप्टेंबर - नाशिक शहराच्या वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मुंबईनाका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी नाशिक शहर पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलले आहे. महामार्ग बसस्थानकात एसटी बसेसच्या प्रवेश (एंट्री) आणि बाहेर पडण्याच्या (एक्झिट) मार्गात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेला यशस्वी बदल आता पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी सुधारित अधिसूचना जारी केली असून, १९ सप्टेंबर २०२६ पासून ही नवी नियमावली अंमलात आली आहे.
एकाच गेटमुळे मुंबईनाका सर्कलवर होत होती कोंडी
मुंबईनाका सर्कल हे नाशिक शहरातील अंतर्गत वाहतुकीसह शहराबाहेर जाणाऱ्या महामार्गांना जोडणारे अतिशय वर्दळीचे ठिकाण आहे. या सर्कलला लागूनच असलेल्या महामार्ग बसस्थानकातून सुटणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेसची वाहतूक यापूर्वी सर्कलसमोरील एकाच मुख्य गेटवरून चालत होती. त्यामुळे बसस्थानकातून बाहेर पडताना एसटी बसेसना मुख्य रस्ता क्रॉस करावा लागत असे. परिणामी, इतर वाहनांच्या वाहतुकीस सतत अडथळा निर्माण होऊन मुंबईनाका चौकात दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.
यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी अधिसूचना काढून १९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२६ या एका महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन मार्ग निश्चित केले होते. हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला असून मुंबईनाका परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित झाली आहे. नागरिकांची सोय आणि कोंडीमुक्तीचा सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन ही व्यवस्था पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
असा असेल एसटी बसेसचा सुधारित मार्ग
सुधारित अधिसूचनेनुसार महामार्ग बसस्थानकातील वाहतुकीचे नियम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:
बसस्थानकात प्रवेश (आगमन मार्ग) :
मुंबईनाका सर्कल येथील साहेबा हॉटेललगतचे गेट केवळ बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व एसटी बसेस याच गेटमधून स्थानकात प्रवेश करतील.
बसस्थानकातून बाहेर पडणे (निर्गमन मार्ग) :
रुची हॉटेलसमोरील गेट हे बसेसना बाहेर पडण्यासाठी राखीव करण्यात आले आहे.
शहरातील फेरीचा मार्ग :
रुची हॉटेलसमोरील गेटवरून बाहेर पडणाऱ्या बसेस थेट रस्त्यावर न येता डावीकडे वळण घेऊन सुयश हॉस्पिटल – एसएसके हॉटेल – चांडक सर्कल – उजवीकडे शासकीय विश्रामगृह – गडकरी सिग्नल – उजवीकडे कालिकादेवी मंदिर – संदीप हॉटेल – रुची हॉटेलमार्गे मुंबईनाका सर्कलकडे मार्गस्थ होतील.
एसटी महामंडळाला स्पष्ट सूचना व कारवाईचा इशारा
या वाहतूक नियमांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एसटी महामंडळाला बसस्थानकाच्या प्रवेशद्वार व बाहेर पडण्याच्या मार्गावर प्रवाशांसाठी व चालकांसाठी ठळक दिशादर्शक व मार्गदर्शक सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व एसटी आगारांमधील चालक व वाहकांना याच मार्गाचा वापर करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एसटी चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११९/१७७, १२२/१७७ व इतर लागू कायद्यांनुसार कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी दिला आहे.