नाशिककरांनो लक्ष द्या... एसटी बस फेऱ्यांचे नियोजन बदलले... निमाणी, मेळा व नवीन सीबीएसवरून सुटणाऱ्या बसेसचे नवे मार्ग जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १९ सप्टेंबर - नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान करण्यासाठी नाशिक शहर पोलीस प्रशासनाने एसटी बस वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंचवटी परिसरातील निमाणी बसस्थानकाच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर मेळा आणि नवीन सीबीएस बसस्थानकावर हलवण्यात आलेली बस फेऱ्यांची व्यवस्था आता पुढील तीन महिन्यांसाठी कायम ठेवण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भातील सुधारित अधिसूचना अधिकृतरीत्या जारी केली असून, ही नियमावली २२ सप्टेंबर २०२६ पासून ते २१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

Advertisement

का घेण्यात आला निर्णय?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी महामंडळ) निमाणी बसस्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच द्वारका सर्कल उड्डाणपुलाखालील धुळे आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे एसटी प्रशासनाच्या विनंतीवरून १२ सप्टेंबर रोजी ८ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर बस फेऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. या तात्पुरत्या बदलामुळे निमाणी, पंचवटी आणि द्वारका परिसरातील वाहतूक सुरळीत राहून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे स्पष्ट झाले. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने एसटी महामंडळाने मुदतवाढीची विनंती केली होती, त्यानुसार हा सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे.

कोणती बस कुठून सुटणार? (स्थानकनिहाय वर्गीकरण)

प्रवाशांचा कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी बसस्थानकानुसार फेऱ्यांचे विभाजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:

निमाणी बसस्थानक :
येथून येवला, लासलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, बुलढाणा आणि लोणार मार्गे धावणाऱ्या सर्व बसेस सुटतील.
मेळा बसस्थानक :
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे (शिवाजीनगर) मार्गावरील बसेस; तसेच उत्तर महाराष्ट्र व आंतरराज्य मार्गावरील मालेगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर, शहादा, सुरत, वापी, इंदूर आणि त्यापुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या मेळा स्थानकावरून चालविल्या जातील.
नवीन सीबीएस (ठक्कर बाजार) बसस्थानक :
त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी या ग्रामीण फेऱ्या, पालघर विभाग तसेच त्र्यंबकेश्वर-पुणे, नंदुरबार, साक्री, सटाणा, वलसाड, कळवण, पेठ, सप्तशृंगीगड व सुरगाणा या मार्गावरील ग्रामीण वाहतूक येथून सुरू राहील.
महामार्ग बसस्थानक :
शिर्डी, अहिल्यानगर तसेच कसारा व मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या महामार्ग बसस्थानकावरून सुटतील.
शहरातील जाण्या-येण्याचे प्रमुख मार्ग
छत्रपती संभाजीनगर मार्ग : निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस काट्या मारुती चौक, संतोष टी पॉईंट, स्वामीनारायण चौक, नांदूरनाका व शिलापूर टोलनाकामार्गे जातील. परतीचा प्रवास शिलापूर टोलनाका, नांदूरनाका, स्वामीनारायण चौकातून उजवीकडे वळून अमृतधाम, तारवाला सिग्नल, दिंडोरी नाकामार्गे निमाणी असा राहील.
धुळे व जळगाव मार्ग (मेळा स्थानक) : मेळा बसस्थानक, जुनी जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, नॅशनल उर्दू हायस्कूल, मदिना चौक, मुंबईनाका उड्डाणपुलाखालून, वडाळानाका, द्वारका, संतोष टी पॉईंट, स्वामीनारायण चौक, अमृतधाम, बळीमंदिर, आडगावकडे जातील. परतीच्या प्रवासात याच मार्गाने आडगाव, जत्रा हॉटेल, द्वारका, मुंबईनाका, सारडा सर्कल व त्र्यंबकनाका सिग्नलमार्गे मेळा बसस्थानकावर येतील.
पुणे (शिवाजीनगर) मार्ग : मेळा बसस्थानक, गडकरी सिग्नल, मुंबईनाका सर्कल, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, साईनाथ सिग्नल, रवीशंकर मार्ग, फेम सिग्नल, उपनगर, दत्तमंदिर, बिटको, सिन्नर फाटामार्गे पुणे जातील. परतीचा मार्ग सिन्नर फाटा, बिटको, दत्तमंदिर, सम्राट सिग्नल, डीजीपीनगर रोड, वडाळागाव, कलानगर, लेखानगर, इंदिरानगर भुयारी मार्ग, मुंबईनाका व गडकरी सिग्नलमार्गे मेळा बसस्थानक असा राहील.
पेठ, कळवण व सप्तशृंगीगड मार्ग : नवीन सीबीएस, जुनी जिल्हा परिषद, सारडा सर्कल, मुंबईनाका, द्वारका, निमाणी व दिंडोरी नाकामार्गे जातील. परतीच्या प्रवासात निमाणी, आडगाव नाका, द्वारका, मुंबईनाका, सारडा सर्कल व त्र्यंबकनाकामार्गे नवीन सीबीएस येथे पोहोचतील.
मुंबई व शिर्डी मार्ग : महामार्ग बसस्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या इंदिरानगर बोगदा, लेखानगर, पाथर्डी फाटा व गरवारे पॉईंटमार्गे धावतील.

उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा
शहरातील वाहतुकीची शिस्त अबाधित राखण्यासाठी एसटी महामंडळाने बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक व सुरक्षा वॉर्डनची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम ११९/१७७, १२२/१७७ व २०७ अन्वये कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी दिला आहे. प्रवाशांनी या नवीन मार्गांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.