फरार डॉ. निलेश जेजूरकर पोलिसांच्या जाळ्यात... पत्नी डॉ. मनीषाच्या आत्महत्येविषयी म्हणाला...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - आपल्या डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या फरार आरोपी पतीच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मोठे यश आले आहे. डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर (वय ४२, रा. फ्लॅट क्र. १४, रेवती ब्ल्यू अपार्टमेंट, अरिहंत नर्सिंग होम समोर, डिकेनगर, गंगापूर रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे.

घटना आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉ. मनीषा जेजूरकर आणि संशयित डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून डॉ. मनीषा जेजूरकर यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात ८ मार्च २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ अन्वये पती डॉ. नीलेश जेजूरकर याच्याविरोधात पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित डॉ. नीलेश जेजूरकर हा पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी फरार झाला होता. गेल्या सात महिन्यांपासून तो विविध ठिकाणी लपून राहून पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

द्वारका सर्कल येथे रचला सापळा

गंभीर स्वरूपाचा गुन्हा आणि दीर्घकाळापासून फरार असलेला आरोपी यामुळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) आणि सहायक पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. गुन्हे शाखेला या फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे कडक निर्देश देण्यात आले होते.

Advertisement

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या जाळ्याद्वारे आरोपीचा मागोवा घेत होते. शोधमोहीम सुरू असतानाच पोलीस हवालदार विशाल काठे व प्रशांत मरकड यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, फरार संशयित डॉ. नीलेश जेजूरकर हा काही वैयक्तिक कामासाठी द्वारका सर्कल परिसरात येणार आहे.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित द्वारका सर्कल भागात मोर्चेबांधणी करून सापळा रचला. संशयित परिसरात येताच पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.

गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन; गुन्ह्याची कबुली

ताबा घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल विचारपूस केली असता, त्याने डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्येच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची आणि फरार असल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पुढील कायदेशीर कारवाई आणि अटकेच्या प्रक्रियेसाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

ही धडक कारवाई नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, चेतन श्रीवंत, रमीज शेख यांच्यासह पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, महेश साळुंके, गणेश रूमाले, मुक्तार शेख व इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.