हॉटेलच्या गल्ल्यावर विश्वासू नोकराचा डल्ला... १३ वर्षांत ४३ लाखांची हातोहात चोरी...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - ज्या नोकरावर मालकाने डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यानेच १३ वर्षे दररोज थोडी थोडी चोरी करत हॉटेलच्या गल्ल्यावर तब्बल ४३ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. दूध बाजार परिसरातील प्रसिद्ध 'छोटे मिया' हॉटेलमध्ये ही घटना घडली असून, चोरी करताना रंगेहात पकडल्या गेल्यानंतर या १३ वर्षांच्या फसवणुकीचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित कॅशियरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्माईल रशिद तवा (वय ५०, रा. खडकाळी, जुने नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कॅशियरचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक रफी नसीम पठाण (रा. मदिना चौक, जुने नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रोज २ हजार रुपयांची 'हात की सफाई'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफी पठाण यांचा हॉटेल आणि केटरिंगचा मोठा व्यवसाय असून दूध बाजारात त्यांचे 'छोटे मिया' नावाचे हॉटेल आहे. संशयित इस्माईल तवा हा गेल्या १३ वर्षांपासून या हॉटेलवर कॅशियर म्हणून काम पाहत होता. जुना आणि अत्यंत विश्वासू नोकर असल्याने मालकाने त्याच्यावर हॉटेलच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची आणि गल्ल्याची जबाबदारी सोपवली होती.

याच विश्वासाचा गैरफायदा घेत संशयिताने दररोज जमा होणाऱ्या रकमेतून रोज साधारण दोन हजार रुपये हातोहात चोरण्यास सुरुवात केली. दिवसभराच्या गल्ल्यातून मालकाच्या नकळत रोजची ही 'हात की सफाई' सुरु होती.

रंगेहात पकडल्याने भांडाफोड

Advertisement

गेल्या १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळात दरडोई दोन हजार रुपये याप्रमाणे संशयिताने तब्बल ४३ लाख रुपये लांबवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी गल्ल्यातून पैसे चोरताना हॉटेल मालकाने त्याला ऐनवेळी रंगेहात पकडले. त्यानंतर संशयिताची कसून चौकशी केली असता, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेल मालकाने तातडीने भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. पोलिसांनी संशयित इस्माईल तवा याच्याविरुद्ध फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

 

दुचाकीची डिक्की फोडली

दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बेकरी व्यवसायाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार समर्थनगर भागात घडली. या घटनेत ३० हजाराच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्शल सत्येन भामरे (रा.रामवाडी पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भामरे बेकरी व्यवसायीक असून, समर्थ नगर येथे त्यांची बेकींग इमोशन नावाची बेकरी आहे. गेल्या शुक्रवारी (दि.४) सकाळी नियमीत पणे भामरे बेकरी पदार्थाचे वितरण व वसूली करून दुपारी बेकरीवर गेले असता ही घटना घडली. दुपारच्या सुमारास आपला व्यवसाय सांभाळत असतांना अज्ञात चोरट्यांनी बेकरी समोर लावलेल्या एमएच १५ एचजे ९८१९ या अ‍ॅक्टीव्हाची डिक्की उघडून वसूलीची ३० हजाराची रोकड चोरून नेली. या गुह्याचा तपास हवालदार जाधव करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.