नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - पखालरोड भागातील नासर्डी नदीच्या पात्रातून शासकीय रॉयल्टी न भरता राजरोसपणे चालणाऱ्या वाळू तस्करीचा मुंबईनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ ब्रास वाळूसह 'छोटा हत्ती' वाहन जप्त केले असून, दोघांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळशीराम एकनाथ वाघेरे (रा. मखमलाबाद) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
पोलिसांची छापा सत्र कारवाई
पखालरोड येथील नासर्डी पुलाखाली बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती मुंबईनाका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि. १४) दुपारी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी काही तरुण मालवाहू वाहनात (MH 04 GF 5437) वाळू भरताना आढळून आले.
चालकासह मजूर ताब्यात
कारवाईदरम्यान पोलिसांनी टेम्पो चालक शेख मुज्जमील अब्दुल लतीफ आणि मजूर राजू रामदास वारडे (रा. एकलव्यनगर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस तपासात हे वाहन जीया शेख नामक व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे.
१ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
घटनास्थळावरून १ लाख ३५ हजार ७२५ रुपये किमतीचे 'छोटा हत्ती' वाहन आणि एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षक डी. टी. गाढवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.