नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - शहरात एकतर्फी प्रेमातून विनयभंग केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून, यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलीसह एका तरूणीची अडवणूक करत त्यांना जिवे मारण्याची व घर जाळण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलीला 'घर जाळण्याची' धमकी
जेलरोड भागातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तोंडओळखीचा असलेला रेहान शेख हा तरुण तिला सातत्याने त्रास देत होता. ११ ते २७ ऑगस्ट दरम्यान मुलगी नारायण बापू नगर भागातून पायी जात असताना आणि मावशीच्या घरी जात असताना संशयिताने तिची वाट अडवून विनयभंग केला. "माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुझे घर जाळून टाकेन," अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या मुलीने पोलिसांत तक्रार नोंदवली असून, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक पावरा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
साखरपुडा झालेल्या तरूणीची अडवणूक
दुसरी घटना नाणेगाव रोडवरील रेणुकानगर भागात घडली. पीडित तरूणीचा साखरपुडा झालेला असतानाही श्रीराम हिरामण निकम या तरुणाने एकतर्फी प्रेमातून तिच्या हातात देवाची मूर्ती देत विनयभंग केला. "ठरलेले लग्न मोडून टाक, नाहीतर तुला आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारून टाकेन," अशी धमकी संशयिताने दिली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक उपनिरीक्षक बी. आर. म्हसदे पुढील तपास करत आहेत.