म्हणून तोडली गंगापूर रोडवरील ५५ झाडे... धक्कादायक बाब उघड... या ६ जणांना अटक...

Share:
Main Image
Last updated: 17-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - गंगापूर रोडवरील दुभाजकावर लावलेल्या जाहिराती स्पष्ट दिसाव्यात यासाठी महापालिकेने लावलेली तब्बल ५५ झाडे रातोरात तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहस्थाच्या नावाखाली ही वृक्षतोड झाल्याची चर्चा रंगवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात जाहिरात फलकांसाठीच ही कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी 'नम्रता ॲडव्हर्टायझिंग'च्या संचालकासह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

रातोरात तोडली झाडे

गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर दरम्यान दुभाजकात मनपाने सुशोभीकरण व सावलीसाठी ‘टर्मिनेलिया मादागास्कर’ (ख्रिसमस ट्री) ही परदेशी प्रजातीची झाडे लावली होती. ३० ऑगस्टच्या पहाटे संशयितांनी ही ५५ झाडे मुळासकट तोडून टाकली. या वृक्षतोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

२ लाख ७५ हजारांचे नुकसान

श्रीकांत किरण इरणक (रा. दसक, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९३/२०२६ नुसार सार्वजनिक मालमत्तेची चोरी, रस्ता विद्रूपीकरण आणि सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक करण्यात आलेले आरोपी:

Advertisement

मच्छिन्द्र विजय देशमुख (वय ४४, संचालक - नम्रता ॲडव्हर्टायझिंग)

अभिमन काशिनाथ खैरनार (वय ३७)

दिलीप सदू बेंडकुळे (वय ३४)

दीपक संतोष दाते (वय २५)

रोहिदास पांडुरंग खुरखुटे (वय ४५)

अर्जुन दत्तू चारोस्कर (वय ३८)

तपोवनातील वृक्षतोडीचा वाद ताजा असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.