नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - वृद्धाची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकरनेच कुटुंबाचा विश्वासघात करत वृद्धाच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिष कुमार असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित केअरटेकरचे नाव आहे. याप्रकरणी नंदकिशोर मंगलचंद साखला (६०, रा. गाणोरकर हॉस्पिटलजवळ, गायकवाड नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
अनेक वर्षांच्या विश्वासाला तडा
साखला यांचे वयोवृद्ध वडील आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या देखभालीसाठी मनिष कुमार याची नियुक्ती करण्यात आली होती. तो गेल्या अनेक वर्षांपासून साखला यांच्या वडिलांची काळजी घेत असल्याने कुटुंबीयांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता.
अंगावरील दागिन्यांवर मारला डल्ला
बुधवारी (दि. १६) दुपारी नेहमीप्रमाणे कामावर आलेल्या संशयिताने संधी साधून वृद्धाच्या अंगावरील व घरातील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. यात रुद्राक्ष ओवलेली सोन्याची माळ, ब्रेसलेट, तीन सोन्याच्या अंगठ्या, डायमंडची अंगठी, सोन्याचे नाणे आणि रोख रक्कम असा ३ लाख ९३ हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल घेऊन तो पसार झाला.
घटनेनंतर पीडित कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली असून, उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.