नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - ऐतिहासिक सितागुंफा रोड परिसरात असलेल्या देवी मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २५० ग्रॅम वजनाच्या आणि १० हजार रुपये किमतीच्या या मुकुटावर भामट्यांनी डल्ला मारला असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाबत्ती करताना उघडकीस आला प्रकार
या प्रकरणी अनिल सुखदेव वाघ (रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सितागुंफा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ हे आपल्या घर परिसरात असलेल्या 'सप्तशृंगी देवी मंदिरा'ची देखभाल करतात. गेल्या सोमवारी (दि. ७) अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या परिसराचा फायदा घेत भरदिवसा आत प्रवेश केला आणि देवीच्या मूर्तीच्या डोक्यावर असलेला चांदीचा मुकुट चोरून नेला.
सायंकाळच्या सुमारास वाघ हे नेहमीप्रमाणे मंदिरात दिवाबत्ती करण्यासाठी गेले असता, देवीच्या मूर्तीवरील मुकुट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरामध्ये शोध घेऊनही मुकुट न मिळाल्याने त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार कैलास शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.