नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - गोड बोलून विश्वास संपादन करत डॉक्टर पत्नीच्या खात्यावरील तब्बल ५२ लाख रुपये लाटून, घरातील रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे ५५ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अमृतधाम भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतीसह त्याच्या मैत्रिणीविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश गुंडरे आणि त्याची एक महिला मैत्रीण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी अमृतधाम परिसरातील एका ४२ वर्षीय डॉक्टर महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व संशयित पती-पत्नी आहेत. २०२० पासून संशयित पती तक्रारदार डॉक्टर महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत त्याने पत्नीशी गोड बोलून तिच्या बँक खात्यातील तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळवलेली ५२ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतली. याशिवाय बेडरूममधील कपाटात ठेवलेली २ लाख ७५ हजार रुपयांची रोकड आणि २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने परस्पर काढून अपहार केला. तक्रारदारास वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून घरातील संसारोपयोगी साहित्याचीही विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मुलांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, संशयित पतीच्या मैत्रिणीने घरातील संसारोपयोगी वस्तू नेल्या असून, तिने डॉक्टर महिलेला फोन करून ‘तुला व तुझ्या मुलांना जीवे मारून टाकू,’ अशी थेट धमकी दिली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या डॉक्टर महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव पुढील तपास करत आहेत.