३५ वार करून भावजयीचा खून केला... नराधम दिराला नाशिक कोर्टाने दिली ही कठोर शिक्षा...

Share:
Main Image
Last updated: 17-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - पैशांच्या वादातून आपल्याच सख्ख्या भावजयीवर तब्बल ३५ वार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी दिराला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष विष्णू आंबेकर (वय ३१, रा. कोकाटे चाळ, क्रांतीनगर, पंचवटी) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय होती?

ही थरारक घटना ३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीर नगर (भोसला मिलिटरी स्कूलजवळ) येथे घडली होती. मयत पूजा संदीप आंबेकर (वय २७) या आपल्या घरात असताना पैशांच्या क्षुल्लक कारणावरून तिचा दीर आरोपी संतोष आंबेकर याच्याशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या संतोषने पूजा यांच्यावर धारदार शस्त्राने गाल, छाती, पोट, हात, मान आणि पाठीवर सलग ३५ गंभीर वार करून जागीच ठार केले होते. याप्रकरणी मयत पूजा यांच्या आई चंद्रभागा प्रकाश मेढे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात दोषारोप सिद्ध

Advertisement

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज रैनुद्दीन शेख यांनी या प्रकरणाचा अतिशय चिकाटीने तपास करून परिस्थितीजन्य व तांत्रिक पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय (कोर्ट क्र. १) च्या न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांच्यासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांचे सबळ पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी संतोष आंबेकर याला भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून 'मरेपर्यंत फाशी' ची शिक्षा सुनावली.

सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती भानुप्रिया पेठकर आणि श्री. आर. पी. गावीत यांनी प्रभावी युक्तिवाद करत पुरावे मांडले. तसेच अभियोग कक्षाचे सपोउपनिरीक्षक जयवंत गुळवे, कोर्ट पैरवी अंमलदार रंजना गायकवाड, रिना आहेर आणि सागर बागुल यांनी खटल्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.