निवेदनांना केराची टोपली... मुख्याधिकार्‍यांच्या टेबलावर थेट सोडली मोकाट कुत्री... या अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 17-Sep-2026

निफाड, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाकडे आणि त्यावरील उपायांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या निफाड नगरपंचायत प्रशासनाविरोधात युवासेनेने अत्यंत अनोखे आणि आक्रमक आंदोलन छेडले. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिरून त्यांच्या टेबलावर ४ ते ५ मोकाट कुत्री सोडली. एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालून प्रशासकीय निष्क्रीयतेचा जोरदार निषेध केला. या घटनेमुळे नगरपंचायत कार्यालयात काही काळ मोठी खळबळ उडाली होती.

नागरिकांचे आरोग्य अन् सुरक्षा धोक्यात

निफाड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या कुत्र्यांनी लहान मुले, महिला, वृद्ध आणि दुचाकीस्वारांवर हल्ले करून त्यांना चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपघातांचा धोकाही वाढला आहे.

'आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी!'

Advertisement

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नगरपंचायतीकडून केवळ आश्वासने दिली जातात, प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही, असा आरोप रंधवे यांनी केला. "अजूनही ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा मुख्याधिकारी कार्यालयात मोकाट कुत्री सोडून तीव्र आंदोलन करू," असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात नगरसेविका रुपाली रंधवे, सुनील पाठक, फिरोज पठाण, रतन गाजरे, सचिन खडताळे यांच्यासह अनेक नागरिक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनाची बाजू:

"आतापर्यंत ७३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. नसबंदी मोहिमेसाठी तसेच श्वान पकडण्यासाठी दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या आहेत."

— धीरज भामरे (मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत)

Advertisement

Comments

No comments yet.