लष्करी अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवले.. तरुणाला अडीच लाखांना गंडवले... बापलेकावर गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 16-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ सप्टेंबर - मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात निलेश मोरे आणि पंडित मोरे या बापलेकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवाले

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हर्षद भाऊसाहेब गाढवे (वय २१, रा. धामणगाव, ता. इगतपुरी) आणि संशयित निलेश मोरे हे एकमेकांचे मित्र आहेत. निलेश आणि त्याचे वडील पंडित मोरे यांनी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी अत्यंत जवळच्या ओळखी आहेत, असे भासवून हर्षदचा विश्वास संपादन केला.

Advertisement

वर्ष उलटूनही नोकरी नाही

मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने संशयितांनी हर्षदकडून अडीच लाख रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर संशयितांनी त्याला बदलापूर (जि. ठाणे) येथे नेऊन भरतीपूर्व प्रशिक्षणही दिले. मात्र, प्रशिक्षण पूर्ण होऊन आणि तब्बल एक वर्ष उलटूनही त्याला कोणतीही नोकरी मिळाली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षदने पैशांची मागणी केली असता संशयित बापलेकाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर कोणताच मार्ग न उरल्याने हर्षदने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार माळोदे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.