केशव खेडकर, (नाशिक) १६ सप्टेंबर - नाशिक शहरात पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र शासनाच्या 'PM-eBus Sewa' योजनेंतर्गत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) च्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिली ई-बस आज अखेर प्रत्यक्ष प्रवासी सेवेत धावली. २८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ई-बसेसचे उद्घाटन झाले होते.
आज सकाळी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे आणि उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) संजय सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ई-बस डेपोमधून मार्गस्थ करण्यात आली. पहिल्याच दिवशी नाशिककरांनी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून राजलक्ष्मी सुर्वे व उज्वल सुर्वे हे या ई-बसचे पहिले प्रवासी ठरले.
मार्ग आणि प्रमुख थांबे
प्रारंभिक टप्प्यात २ बसेसच्या माध्यमातून खालील दोन प्रमुख मार्गांवर ही सेवा पुरवली जात आहे:
मार्ग क्र. १०२ (तपोवन टर्मिनस ते बारदान फाटा): जुना आडगाव नाका, रविवार कारंजा, सीबीएस, राजीव गांधी भवन, एचपीटी कॉलेज, महात्मानगर, आयटीआय, सातपूर मनपा कार्यालय, सातपूर कॉलनी, अशोकनगर.
मार्ग क्र. १०३ (तपोवन टर्मिनस ते सिम्बायोसिस कॉलेज): जुना आडगाव नाका, सीबीएस, वेद मंदिर, पवननगर.
भाडेवाढ नाही; पहिल्याच दिवशी ५२६ प्रवाशांचा प्रतिसाद
पहिल्या दिवशी सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत दोन बसेसच्या माध्यमातून एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या, ज्यातून ५२६ प्रवाशांनी प्रवास केला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाने यासाठी कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ केलेली नसून नियमित दरातच हा आरामदायी प्रवास उपलब्ध करून दिला आहे. शांत, आवाजरहित आणि वातानुकूलित प्रवासाचा अनुभव मिळाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुढील विस्तार आणि आवाहन
या ई-बसेसमुळे शहरातील हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, आगामी काळात उर्वरित ई-बसेस टप्प्याटप्प्याने शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू केल्या जातील. नाशिककरांनी या पर्यावरणपूरक प्रवासाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.