नाशिक, (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर - इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन्मित्र वसाहत आणि परबनगर परिसरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यात एका बंदिस्त घरातून तब्बल सव्वा बारा लाख रुपयांचे सोन्याचे अलंकार लंपास करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या घटनेत रात्री फेरफटका मारणाऱ्या एका ६१ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून इंदिरानगर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: घरातून १२.३७ लाखांचे दागिने गायब
सन्मित्र वसाहतीतील अगस्ती तारांगण सोसायटीत राहणाऱ्या यशश्री सुधीर रत्नपारखी (रा. अगस्ती तारांगण सोसायटी) यांच्या घरात ही मोठी चोरी झाली. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी रत्नपारखी यांच्या आईच्या कपाटात ठेवलेले सुमारे १२ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे मौल्यवान अलंकार चोरून नेले. कपाटातील दागिने गायब असल्याचे निदर्शनास येताच रत्नपारखी यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलीस हवालदार परदेशी पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना: वृद्धेचे ३५ हजारांचे मंगळसूत्र लांबवले
दुसरी घटना परबनगर येथील समित्र वसाहत भागात रविवारी (दि. १३) रात्री घडली. मिनाक्षी अशोक वानखेडे (वय ६१, रा. कृष्णा अपार्टमेंट, परबनगर) या रात्रीचे जेवण आटोपून घर परिसरात फेरफटका मारत होत्या. त्या सिद्धी इलाईट या इमारतीसमोरून आपल्या घराच्या दिशेने पायी जात असताना, अचानक दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरीने ओरबाडून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार हारपड घटनेचा तपास करत आहेत.
इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.