मालेगावच्या विकासाला मोठा हातभार... मंत्री भुसेंच्या प्रयत्नांतून १९ विकासकामांसाठी एवढा निधी मंजूर...

Share:
Main Image
Last updated: 15-Sep-2026

मालेगाव, (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर - मालेगावचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या सूचनेनुसार, नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी मालेगाव तालुक्यातील विविध पायाभूत आणि शैक्षणिक विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने (PMKKKY) अंतर्गत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खाणबाधित क्षेत्रातील विकासासाठी एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

१८ जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय

मालेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री दादाजी भुसे यांनी स्थानिक पातळीवरील शैक्षणिक आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. या निधीतून मालेगाव तालुक्यातील १८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची अखंड सोय उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रत्येक शाळेसाठी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय होणाऱ्या शाळा:

Advertisement

आघार खुर्द (बंधारपाडा), काष्टी, घाणेगाव, टिंगरी, वाके (डोंगराळे), निळगव्हाण, पांढरुण, रावळगाव, वडेल, सौंदाणे, आघार खुर्द, अंजन, वडेल (उंबरेश्वर), कंदाणे, लेंडाणे, गुगळवाड, मोहपाडा आणि टिपे येथील जिल्हा परिषद शाळांचा यात समावेश आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग (मालेगाव) मार्फत केली जातील.

सोयगाव–फौजदारवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण

शैक्षणिक सुविधांसोबतच परिसरातील वाहतूक अधिक सुलभ व्हावी यासाठी सोयगाव सब स्टेशन ते फौजदारवाडी (ग्रामा-२३५) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ३२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या उत्तर विभाग क्र. २ च्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत पूर्ण केले जाईल.

रॉयल्टी वेळेत भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

खाणधारकांनी आपले देय स्वामित्वधन (रॉयल्टी) वेळेत व पारदर्शकपणे जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जमा होणाऱ्या या निधीतूनच खाणबाधित भागांत शाळा, रस्ते आणि इतर नागरी सोयीसुविधांची कामे हाती घेणे शक्य होते. त्यामुळे सर्व खाणधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करून ऑनलाइन मार्गदर्शक सूचनांनुसार वेळेत निधी जमा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Comments

No comments yet.