नाशिक, (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर - खुटवडनगर भागात गॅस सिलिंडर वितरीत करण्यासाठी गेलेल्या एका डिलिव्हरी बॉयला विनाकारण मारहाण करत त्रिकुटाने साडेचार हजार रुपयांचे भरलेले सिलिंडर पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
सुरेश हिराराम बिष्णोई (वय २७, रा. शिंगाडा तलाव, गुरुद्वारारोड) असे लुटमार झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून, ते एका गॅस एजन्सीत काम करतात. गेल्या मंगळवारी (दि. ८) सकाळी सुरेश हे गॅस वितरणासाठी खुटवडनगर भागात गेले होते. वावरे नगर येथील निवृत्ती प्रभा बिल्डींगसमोर आपले वाहन उभे करून ते एका ग्राहकाला सिलिंडर पोहोचवण्यासाठी गेले होते.
तेथून परतत असताना संशयितांनी त्यांना गाठले. कुठलेही कारण नसताना संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात बिष्णोई जमिनीवर कोसळले.
दुचाकीवरून सिलिंडर पळवले
बिष्णोई खाली पडल्याची संधी साधत संशयितांनी एजन्सीच्या वाहनातील सुमारे साडेचार हजार रुपये किमतीचे भरलेले गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यानंतर ते सिलिंडर 'एमएच १५ केई ९८३९' क्रमांकाच्या दुचाकीस बांधून घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी याप्रकरणी यश नितीन वालझाडे, अभिषेक भगवान कराड आणि यश रवींद्र कापडणे या तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.