नाशिक, (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर - वडाळा-पाथर्डी रोडवरील साळवे मळा भागात वाहन पार्क करण्यावरून एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भामट्यांनी खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतली असून, पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी अंबड लिंकरोडवरील व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
संजय विश्वनाथ माळी (वय ५०, रा. गंगेश्वर रेसिडेन्सी, एकदंतनगर, अंबड लिंकरोड) असे लुटल्या गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. माळी हे गेल्या गुरुवारी (दि. १०) रात्री वडाळा पाथर्डी रोडवरील गुरु गोविंद कॉलेज शेजारील साळवे मळा भागात आपले वाहन पार्क करत होते.
यादरम्यान, तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठले आणि "इथे गाडी लावायची असेल तर हप्ता द्यावा लागेल," असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. यानंतर संशयितांनी चाकू हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली.
रोख रक्कम लांबवत दिली जीवे मारण्याची धमकी
टोळक्याने माळी यांच्याशी धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. तसेच, "याप्रकरणी पोलिसात गेला तर तुझा गेम करू," अशी थेट धमकी देत तेथून पळ काढला. या जीवे मारण्याच्या धमकीमुळे काही काळ भीतीचे वातावरण होते, परंतु अखेर माळी यांनी पोलिसांकडे जात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.