नाशिक, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला 'युनेस्को'चा (UNESCO) 'अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा' दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'bappa.org' या अभिनव डिजिटल अभियानाची सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या लोकचळवळीच्या माध्यमातून राज्यातील गणेशोत्सवाचे जागतिक पटलावर डिजिटल दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. या अभियानाच्या नाशिक जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त श्याम गोसावी यांची 'जिल्हा नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती केली आहे.
'bappa.org' पोर्टलची वैशिष्ट्ये आणि जनसहभाग:
जागतिक व्यासपीठ: पुरात्तत्व संचालनालयाने विकसित केलेल्या या पोर्टलवर महाराष्ट्र, भारत आणि जगातील ३५ हून अधिक शहरांतील नागरिक आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी आणि खाद्यसंस्कृतीची माहिती व्हॉट्सअॅप अथवा ऑनलाइन अपलोड करू शकतात.
‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर’ प्रमाणपत्र: या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाची माहिती नोंदवणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे अधिकृत 'Digital Cultural Preserver Certificate' देऊन सन्मानित करण्यात येईल.
आर्थिक व पर्यटन विकास: मूर्तिकार, लोककलावंत व कारागिरांच्या कलापरंपरांचे जतन करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे आणि महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
नाशिकमध्ये व्यापक प्रसाराचे नियोजन:
सहआयुक्त श्याम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती आणि नागरिकांना या मोहिमेत जोडून घेतले जाणार आहे.
नागरिकांच्या सुलभ सहभागासाठी जिल्ह्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, नागरी सुविधा केंद्रे आणि शासकीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअॅप QR कोड असलेले होर्डिंग्ज व डिजिटल स्क्रीन लावण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.