नाशिक, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - उत्तर महाराष्ट्राला जागतिक खगोल पर्यटनाच्या (Astro-Tourism) नकाशावर आणण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या आदिवासीबहुल गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’ विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उधमाळ गावाला प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हा नियोजन निधीतून या प्रकल्पासाठी ₹४२.१४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियोजन:
सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP): हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी तत्त्वावर राबवला जात असून यात 'स्वदेस फाउंडेशन' आणि 'ॲस्ट्रोनेरा' या संस्था तांत्रिक व अंमलबजावणी भागीदार आहेत. कळवणच्या प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये यांच्या नेतृत्वाखाली ही अंमलबजावणी होत आहे.
आधुनिक खगोल सुविधा: आकाशदर्शनासाठी ३६० अंश व्ह्यू असलेला ‘ॲस्ट्रो-स्लॅब’ उभारला जात आहे. प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी गावात विशेष 'शिल्डेड' आणि कमी तीव्रतेचे पथदिवे बसवले जात आहेत.
‘बत्ती गूल अमावास्या’ अन् फेस्टिव्हल: दर अमावास्येला कृत्रिम दिवे बंद करून 'बत्ती गूल अमावास्या' उपक्रमाद्वारे पर्यटकांना आकाशगंगेचे दर्शन घडवले जाईल. तसेच आगामी ३१ ऑक्टोबर रोजी विशेष ‘स्टारगेझिंग फेस्टिव्हल’ आयोजित केला जाणार आहे.
आदिवासी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण:
उधमाळ ग्रामसभेने या प्रकल्पासाठी 'डार्क स्काय पॉलिसी' मंजूर केली आहे. या उपक्रमामुळे पर्यटनाचा थेट आर्थिक फायदा स्थानिक आदिवासी कुटुंबांना होणार आहे. गावात होम-स्टे, पारंपरिक वारली कला, स्थानिक खाद्यसंस्कृती व संगीत पर्यटकांसाठी उपलब्ध असेल. स्थानिक तरुणांना दुर्बीण हाताळणी, खगोलशास्त्राची माहिती आणि आदरातिथ्य (Hospitality) व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
स्थानिक आमदार नितीन पवार यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला आणि स्थानिक आदिवासी विकासाला एक नवी व मोठी दिशा देणारा ठरणार आहे.
?s=20