दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक)१३ सप्टेंबर - नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, हायटेक आणि वेगवान करण्यासाठी नाशिक शहर पोलीस व महापालिकेतर्फे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील प्रमुख आणि गर्दीच्या २८ चौकांमध्ये अॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक CONTROL सिस्टीम (ATCS) वर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला एआय स्मार्ट सिग्नल या महिन्याच्या अखेरीस ‘बाली मंदिर चौकात’ कार्यान्वित केला जाईल.
एआय (AI) सिग्नलची वैशिष्ट्ये व फायदे:
वाहनांच्या गर्दीनुसार वेळेचे नियोजन: पारंपारिक सिग्नलप्रमाणे ठराविक वेळेवर (टाइमर) हे सिग्नल चालणार नाहीत. रस्त्यावर वाहनांची किती गर्दी आहे, हे पाहून रिअल-टाईममध्ये रेड आणि ग्रीन लाईटची वेळ आपोआप कमी-जास्त होईल.
वेळ आणि इंधनाची बचत: रिकाम्या रस्त्यावर सिग्नल ग्रीन राहिल्याने होणारा वेळेचा अपव्यय टळेल. वाहनधारकांना चौकात विनाकारण ताटकळत राहावे लागणार नाही.
सिग्नल जंपिंगला आळा: अनेकदा रस्ता मोकळा असतानाही सिग्नल रेड असल्यास वाहनचालक सिग्नल तोडतात. एआय सिस्टीममुळे ट्रॅफिक फ्लो सुरळीत राहिल्याने नियमभंगाचे प्रकार कमी होतील.
'ओव्हरहेड मॅस्ट आर्म' स्ट्रक्चर: नवीन सिग्नल रस्त्याच्या कडेला लावण्याऐवजी उंचावरून रस्त्याच्या मध्यभागी (Mast Arm) लावले जातील. यामुळे पुढे बस किंवा ट्रकसारखी मोठी वाहने असतानाही मागे असणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल स्पष्ट दिसेल.
‘या’ २८ चौकांमध्ये बसवले जाणार स्मार्ट सिग्नल:
मालेगाव स्टँड, सारडा सर्कल, मायको सर्कल, मॅरेथॉन चौक, कॉलेज रोडवरील मॉडेल चौक, भोसला टी पॉइंट, पारिजात नगर चौक, तिबेटीयन मार्केटजवळील एचडीएफसी चौक, दत्ता चौक, डी. के. नगर, सकाळ सर्कल, सातपूर एमआयडीसीतील कार्बन नाका, सातपूर कॉलनीतील श्री राम सर्कल यांसह शहरातील इतर गजबजलेल्या २८ प्रमुख चौकांचा यात समावेश आहे.
सध्या नाशिक शहरात सुमारे ४० सिग्नल कार्यान्वित असून, नवीन २८ स्मार्ट सिग्नल टप्प्याटप्प्याने बसवले जाणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या लाखो वाहनांचे नियोजन करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत मोलाची ठरणार आहे